१४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
फेडरेशन व समता सैनिक दलातर्फे हार अर्पण केल्यावर भारतीय सत्यप्रसारक जलसा मंडळ, बेझनबाग, आंबेडकर सोशल क्लब लायब्ररी, साहित्य चर्चा मंडळ, अस्पृश्य महिला वसतीगृह, आंबेडकर सहाय्यक समाज, विजयी समाज, महार नवयुवक दल, भानखेडा, बालवीर वाचनालय, सिरसपेठ, समताविजयी समाज, कुंभारपुरा वगैरे असंख्य गटांकडून हार अर्पण करण्यात आले, त्यांची यादी देणे स्थलअभावी कठीण होईल. यानंतर एक लहानसा पोवाडा डाँक्टरसाहेबाच्या कामगिरीवर श्री. बाबू मेश्राम इंदोरा यांच्यातर्फे म्हणण्यात आला व बाबासाहेबांना दोन उपदेशपर गोष्टी सांगण्याबद्दल विनंती करण्यात आली. क्षणार्धात सुई पडेल तिचा आवाज ऐकू येईल इतकी शांतता झाल्यावर बाबासाहेब बोलण्यास उठत आहेत हे पाहून जोराचा टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाचा जयघोष केल्यावर बाबासाहेब म्हणाले,
बंधु भगिनींनो,
इतक्या अल्पावधीत वारा, पाऊस व विजांच्या कडकडाटात माझ्या अपेक्षेच्या बाहेर जमलेला लोक समुदाय पाहून मी आपल्या सर्वाचे अभिनंदन : करतो. दुसरे असे की, मी ज्या कामाकरिता येथे आलो त्या कामाची मंडळी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी वाट पहात आहेत. अशावेळी त्यांना जास्त वेळ तिष्ठत ठेवणे हे देखील मला योग्य होणार नाही. तरी आपला जास्त वेळ न घेता एक दोन गोष्टींचा उल्लेख करून मी माझे भाषण संपवीन. तुमच्या प्रांतात झालेल्या बेकीचा विचार करण्याकरिता मला आता वेळ नसल्यामुळे त्याचा विचार मी पुढे कधीतरी करीन. तुम्हास माहीत असेल की तुमच्या प्रांतात ज्या २० जागा मिळविल्या आहेत, त्या किती त्रासाने व कष्टाने मिळविल्या आहेत. तेव्हा त्या राखणे तुमचे कर्तव्य आहे. अस्पृश्य समाज गरीब व निर्धन आहे. त्याला राजकीय सत्ता हाती ठेवणे महाकठीण आहे. त्यातल्यात्यात काँग्रेस सारख्या मोठ्या संस्थेशी टक्कर देणे अत्यंत कठीण आहे. तेव्हा अशा कठीण वेळी ही तुम्हास मिळालेली राजकीय सत्ता राखणे अत्यंत कठीण आहे. तुम्ही निवडणुकीच्या वेळी निवडून दिलेली माणसे आपल्या हिताचे कार्य करतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. त्यांच्या कामावर पाळत ठेवणे, कीन्सिलमध्ये जे कार्य होते त्यात आपल्या हिताचे प्रश्न, ठराव वगैरे मांडतात किंवा नाही, हे पाहणे तुमचे कर्तव्य होय. प्रत्येक सेशनच्या शेवटी या लोकांनी केलेल्या कामगिरीचा जाब आज भरविलेल्या सभेप्रमाणे सभा बोलावून त्या सभेत त्यांना विचारू शकता. जे तुमच्या हिताचे कार्य करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते ज्या कॉन्स्टिट्युअन्सीमधून निवडून आले असतील त्या