१३२
बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग
या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे
दिनांक १४ मे १९३८ च्या कणकवली येथील परिषदेनंतर येथून १०० मैलांवर असलेल्या देवरूख येथे शेतकऱ्यांची सभा भरविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रमुख पुढारी मंडळीसहित ता. १५ मे १९३८ रोजी दुपारी एक वाजता मोटारीने आले. येथे डॉ. आंबेडकरांचे स्वागत करण्याकरिता ४-५ हजार शेतकरी बांधव मोठ्या उत्सुकतेने त्यांची वाटच पाहात होते. या सभेत स्पृश्यास्पृश्य शेतकरी बांधवांबरोबर मुसलमान शेतकरी बांधवही हजर होते ही गोष्ट विशेष होय.
या सभेत भाई चित्रे, डी. व्ही. प्रधान, सुरबा टिपणीस, भास्करराव कोवळे, घाटगे वगैरे पुढारी मंडळींची जोरदार भाषणे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की,
आपला उद्देश खोती बिल पास करणे व शेतकरी वर्गाची गरीब परिस्थिती सुधारणे हा आहे. शेतकऱ्यांनी आपला सनदशीर लढा लढावा व तो लढत असता सर्व बाजूनी शेतकऱ्यांनी आपली संघटना करावी. काँग्रेसने जर खोती बिल नामंजूर केले तर पुढे सत्याग्रहरुपी मोहीमेस शेतकऱ्यांनी सज्ज असावे. कुणबी वर्गाने याहीपेक्षा मोठ्या संख्येने स्वतंत्र मजूर पक्षाला येऊन मिळावे. कारण हाच पक्ष गरीब, कामकरी, शेतकरी वर्गाचे हित साधणारा आहे. उलट काँग्रेस ही सावकार, खोत व पांढरपेशे यांची आहे. कारण ती त्यांच्या पैशावर जगत आहे म्हणून तिच्या मार्फत शेतकऱ्यांचे भले होईल अशी आशा शेतकऱ्यांनी बिलकूल बाळगू नये. तेव्हा सर्व जाती, पंथ भेद दूर ठेऊन सर्व शेतकऱ्यांनी हा लढा जोराने व संघटीतपणे व शिस्तीने लढावा. आपला लढा खऱ्या तत्त्वाचा आहे. हिंदी राजकीय सत्ता शेठजी, भटजी, सावकार, जमिनदारादी भांडवलवाल्यांच्या काँग्रेसच्या हाती जाण्यापेक्षा खऱ्या श्रमजिवी वर्गाच्या हाती गेली पाहिजे. बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे आणि याच दृष्टीने आमचा स्वतंत्र मजूर पक्ष धडाडीने कार्य करावयास पुढे सरसावला आहे.
जनता : २८ मे आणि ४ जून १९३८.