१६-५-१९३८ जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वा- कांक्षा जोपासा - Page 196

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १५८

माझी लायकी सारखी काय करतो ते पाहून घेईन ' हे खोत त्यांची व'

समजतात की काय? कोणताही खोत माझेपुढे आल्यास बुद्धीने मी सहजासहजी त्याचा पाडाव करीन. ते माझी व त्यांची स्वतःची तुलना करीत असल्यास मी म्हणेन की कोठे मी हिमालय पर्वत व कोठे हा मुतखडा ! मी श्रीमंत नसलो तरी आतापर्यंतचे माझे आयुष्य अत्यंत निर्मळ असे आहे व माझे दृष्टीने तुमचे हितास आवश्यक वाटते ते मी करीत आलो आहे आणि

करीत राहणार .

निवडणुकीचे वेळेस काँग्रेसने जी वचने दिली त्यापैकी कोणती पाळली आहेत ? काँग्रेसने आतापर्यंत जी बिले पास केली त्यात शेतकऱ्यांच्या हितसंबंधाचे काय आहे ? उलट खोती बिलासारखे महत्त्वाचे बिल गेले १० महिने काँग्रेस लांबणीवर टाकीत असून निवडणुकीचे वेळी दिलेल्या वचनास हरताळ फासत आहे. आज मी काँग्रेसमध्ये गेल्यास तेथे मला योग्य स्थान मिळणार नाही अगर तेथे माझी प्रतिष्ठा राहणार नाही, असे तुम्हास वाटते काय ? मी काँग्रेसमध्ये गेल्यास माझ्या बुद्धीचे जोरावर तेथेही माझी छाप पाडल्याशिवाय व मानाचे स्थान प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी

माझी खात्री आहे. . गांधींचे प्राण कोणी वाचविले ? मी वाचविले. परंतु गांधींची ही काँग्रेस गरिबांच्या कल्याणाकरिता नाही, अशी माझी ठाम समजूत

झाल्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाण्यास तयार नाही. गांधींच्या व्यक्तित्वापुढे सुभाष बोस, पं. जवाहरलाल नेहरू यांनी आपली मान वाकविली, परंतु गांधींची माझेवर केव्हाच छाप पडली नाही. कांग्रेस ही आतापर्यंत 'भटजी शेठजींच्या' पैशावर पोसली जात असल्यामुळे ती त्यांची 'बटीक' होऊन राहिली आहे. जो ज्यांचे

अन्न खातो तो त्यांचा मिंधा असतो. मग तुम्हीच सांगा शेठसावकारांच्या पैशावर पोसलेली ही काँग्रेस त्यांचे विरूद्ध कशी जाईल ? आजपर्यंत 'भटभिक्षुक' वर्गाने तुमचेकरिता काय केले आहे ? तुम्ही लोकांनी त्यांच्या घरची भांडी घासणे व त्यांच्या बायकांची लुगडी धुणे याखेरीज काय केले आहे ? आज सरकारी नोकरीत कोणते लोक आहेत ? आज कोठेही जा जज्ज, मामलेदार, मुनसफ, कलेक्टर हे सर्व पांढरपेशा वर्गाचे आहेत. आज तुमची संख्या शेकडा ८० पेक्षा जास्त असताना सरकारी नोकरीत तुमचे इतके थोडे लोक असावेत हे कशाचे निदर्शक आहे ? मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर झालेला पाहावयाचे आहे. मला या मूठभर भटजी शेठजीचे राज्य नको असून तुम्हा ८० टक्के लोकांचे राज्य हवे आहे.