१६-५-१९३८ जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वा- कांक्षा जोपासा - Page 198

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १६०

अधिकारावर असलेले ' काँग्रेसचे सर्व दिवाण ' तुरुंगात जाऊन आलेले आहेत. तुम्ही चोरी अगर इतर गुन्ह्याबद्दल तुरुंगात जाणार नसून एका तत्त्वाकरिता तुरुंगवास पत्करणार आहात, हे लक्षात ठेवा.

काँग्रेसचे काही प्रचारक स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल भलताच गैरसमज पसरवीत असून असे भासवीत आहेत की स्वतंत्र मजूर पक्षाची चळवळ ही निव्वळ लबाडीची व अज्ञ शेतकऱ्यास फसविण्याची असून ती डॉ. आंबेडकर यांनी महारांकडून इतर जातीस बाटविण्यास व रोटीबेटी व्यवहाराची गल्लत करण्यास स्थापन केलेली आहे. अशी तुम्ही चुकीची समजूत करून घेऊ नका, असे माझे तुम्हास सांगणे आहे. आमच्या महारात काय चांगल्या मुली नाहीत की काय ? महार जातीवर माझा पूर्ण विश्वास असून ते कायमचे माझे मागे येतील असा मला भरवसा आहे. परंतु तुम्ही कुळवाडी व इतर लोक खोती बिल पास झाल्यावर स्वतंत्र मजूर पक्षाशी असलेला संबंध ' काम झाले रुजू, पगडी करा उजू ' या म्हणीप्रमाणे तोडणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही पिढ्यान्‌ पिढ्या स्वतंत्र मजूर पक्षाशी आपला संबंध कायम ठेवा. कारण खोती बिलानंतर इतर अनेक बिले स्वतंत्र मजूर पक्ष आणणार आहे. कारण स्वतंत्र मजूर पक्षाचे अंतिम ध्येय हेच आहे की शेतकरी व कामकरी यांचे हातात सर्व सत्ता जाऊन त्यांचे सरकार स्थापन व्हावे. अशा आशयाचे बाबासाहेबांचे १.३० तास विचारपरिप्लुत भाषण झाल्यावर भाई सुरेंद्रनाथ टिपणीस, भाई चित्रे, भाई कोवळे, भाई प्रधान वगैरे वक्त्यांची दणदणीत भाषणे होऊन ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ' या जयघोषात सभा समाप्त झाली.