१६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
शेतीच्या उपयोगाचे दोन बैल जप्त न करण्याची उपसूचना मात्र त्यांनी मान्य केली. अशा तऱहेने काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. शेठसावकारांच्या पैशावर निवडून आलेले काँग्रेस सरकार आपल्या अन्नदात्याच्या विरुद्ध कायदे करून शेतकऱ्यांचे हित केव्हाच करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.
खोती नष्ट करण्याचे मी हाती कंकण बांधले आहे. काँग्रेस सरकार बिलाला पाठिंबा देईल किंवा नाही ते सांगता येणार नाही. परंतु वारा उलट दिशेने वाहत आहे. - जर खोती बिल नापास झाले तर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तुरुंगात जाण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही आमच्या मागे आले पाहिजे. इतकी तयारी असल्यावर खोती नष्ट करण्याला अवधी लागणार नाही.
यानंतर शेतकऱ्यांचे आवडते पुढारी श्री. भास्करराव कोवळे बोलावयास उभे राहिले. आपल्या खड्या सुरात ते म्हणाले " राष्ट्रगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही वागा व त्यांनी दिलेला मंत्र बरोबर पाळा. खोत सावकारांच्या थापांना भुलून आपसात फूट पाडू नका म्हणजे खोती नष्ट होण्याला वेळ लागणार नाही.” रा. कोवळे यांचे भाषण संपल्यावर विरोधी पक्षांपैकी कोणाही दोघांना बोलण्याची परवानगी देण्यात आली.