१६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बाहेर निघू नका.” अशातऱ्हेने बरोबर दीड तास सुभेदार साहेबांच्या सहवासात घालवून जड अंतःकरणाने सर्वांनी सुभेदारांचा निरोप घेतला. सर्व मंडळींना पोचविण्याकरिता सुभेदारसाहेब काही अंतरापर्यंत रस्त्यावर आले होते. तेथून दोन वाजता सेंट लुकस नर्सिंग होमचे मेडिकल सुपरिन्टेन्डेन्ट डॉ. क्युलर यांचे निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर सन्माननीय पाहुण्यांना थाटाची पार्टी झाली. त्यानंतर सर्व मंडळी जवळच असलेल्या परिषदेच्या भव्य तंबूकडे । जाण्यास निघाली. बॅन्डचा सुस्वर आवाज चालू होता व खशीचे लेझिम खेळगडीही लोकांची करमणूक करीत होते. पांचगणीचे समता सैनिक दल आपापल्या युनिफॉर्ममध्ये हजर होते. परिषदेच्या चालकांना प्रचारकार्याकरिता जरी एकच पुरा दिवस मिळाला होता तरी जनसमूह दोन हजारापर्यंत जमला होता. परिषदेच्या द्वाराजवळ प्रथमतः सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांना आरती घेऊन ओवाळले व पुष्पहार अर्पण केले. समता सैनिक दलाची व बँन्डची सलामी झाली. आंबेडकर जयनादाचा ध्वनी गगन भेदीत होता. अशा थाटात बाबासाहेब इतर पाहुण्यांसह स्टेजवर विराजमान झाले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. यानंतर स्वागताध्यक्ष श्री. बंदिसोडे व भाई अनंतराव चित्रे यांची भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
आज नऊ दिवस झाले मी सारखा दौऱ्यावर आहे. रात्री मी महाडला दोन
वाजेपर्यंत भाषण केलेले आहे व सकाळी पहाटेसच उठून हा पांचगणीचा प्रवास केला आहे. त्यामुळे मला येथे भाषण करण्याचे त्राण राहिले नाही. तुम्ही सर्वानी जो माझा सत्कार केला आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे. मी काहीतरी बोलावे अशी तुमची इच्छा आहे परंतु काय करू मला तुम्हाला यावेळी निरुत्साही करावे लागत आहे आणि तुम्ही त्याबद्दल रागावणार नाही, अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा माझे येणे या बाजूला होईल त्यावेळी मला तुम्हाला जे काही सांगावयाचे आहे ते सांगेन. आज तूर्त एवढेच सांगतो की, सुदैवाने येथे स्वतंत्र मजूर पक्षाची शाखा स्थापन झालेली आहेच, तिचे सर्वानी सभासद व्हावे व आपल्या पक्षाचे बळ वाढवावे. मला आणखी बोलता येत नाही म्हणून मी पुन्हा आपली माफी मागून रजा घेतो.