१६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा देश किती अफाट आहे ! एकट्या
माणसाने कितीसा कामाचा बोजा न्यावा ? दुसरी गोष्ट माझी प्रकृती हल्ली बरी
नाही. गेल्या दोन महिन्यात ३८ पौंड वजन कमी झाले आहे, तरीपण इतर
भागांच्या मानाने या भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे, याची भरपाई मी केव्हा तरी
करीन इतकेच आश्वासन मी आज देऊ शकतो.
गेल्या दहा वर्षांपासून जे राजकारण व समाजकारण चालू आहे त्या चळवळीचा
ओघ कोणत्या थराला जाईल याची मला भीती वाटते. एक गोष्ट मात्र खरी
की राजकीय बाबतीमध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. डोकावून सुद्धा ज्यांची
सावली लोक घेत नव्हते त्यांचीच १५ माणसे असेंब्लीत बसून अधिकाराने व
हक्काने आपली गाऱ्हाणी सांगू शकतात. आज मुंबईच्या कायदे मंडळात
काँग्रेससारखी प्रबळ संस्था आहे. एवढ्या मोठ्या संस्थेस स्वतंत्र मजूर पक्षाची
भीती वाटते. (टाळ्या) ही गोष्ट अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने काही
कमी नाही. काँग्रेसमध्ये आज लाखो रुपये खर्च करणारे सावकार
आहेत. शिक्षणामध्ये पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. काही म्हटले तरी
४० वर्षांचा तिच्या पाठीमागे इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापून अवघे एक वर्ष झाले आहे. तरी एका वर्षात कामगिरी इतकी मोठी झाली आहे की स्वतंत्र मजूर पक्षाचे नाव ठाऊक नाही असा एकही स्त्री-पुरुष आढळणार नाही. परंतु त्याची इतर पक्षास भीती वाटते हा राजकारणातील विलक्षण प्रकार आहे. मराठा अगर कुणबी यांना आपणाजवळ याचना करण्याची लाज वाटत होती ते लोक जाहीर रीतीने तिकीटावर उभे राहिले. स्वतंत्र मजूर पक्षात कायस्थ, मराठे वगैरे जातींचा समावेश आहे, ही गोष्ट हिंदुस्थानाच्या इतिहासात अपूर्व आहे. राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेव जरी आड आला तरी थांबवू शकणार नाही. (टाळ्या) हा नदी नाला नाही, पण सिंधू नद आहे. धरण बांधले तरी फूटून जाईल. राजकारणातील हक्क मिळवून घेण्यास अडचण पडणार नाही. १५ माणसांनी काय केले ? - काहीही झाले तरी ते आजच सांगणे कठीण आहे. आज २००० वर्षांपासून रूढी मानगुटीवर बसली आहे. तिला समूळ नाहीशी करण्यास १०-२० वर्षे देणे अन्यायाचे होईल. राजकारणात ऐक्य व संघटना जितकी जास्त तितकी लवकर प्रगती होते. या बाबतीत आपल्या समाजाविषयी मला अभिमान वाटतो. इलेक्शनच्या वेळी जो प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना दाखविली त्याच्या इतका प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना या प्रांतामध्ये इतर कोणत्याही जातीने दाखविली नाही. आपण दारिद्र्याने व्यापलेले, दुःखाने गांजलेले आहोत. याचा विचार