१७-६-१९३८ राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेवही थांबवू शकणार नाही - Page 208

१७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जो दुसऱ्याच्या मदतीवर जगतो अगर जिवंत राहतो तो दुसऱ्याचा गुलाम अगर अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसच्या हरिजन सेवक संघाचा फंड घेतला नाही. त्यांचे ८-१० लाख रुपये घेतले असते तर मी त्यांचा गुलाम म्हणून राहिलो असतो व मला तुमच्याकरता काही करता आले नसते. त्यांच्या हजारो रुपयांपेक्षा तुमची पावली मला लाखाची आहे. (टाळ्या) तुमचा संसार तुम्ही स्वतःच्या शिरावर घ्या. त्यात तुमचाच फायदा आहे. आपणास काँग्रेसचा पैसा नको. काँग्रेसचे प्रचारक दरमहा ३०-४० रुपये घेऊन काम करतात. आपले सेवक नुसते दरमहा १० रुपये घेऊन काम करण्यास तयार होतील. स्वतंत्र मजूर पक्ष तुमचा आहे. त्यास तुम्ही मजबूत केले पाहिजे.

मी २० वर्षांचा असताना बी. ए. झालो. मला २००० वर पगार सांगून आले आहेत. माझ्या बरोबरीचे मुलगे डिस्ट्रिक्ट जज्ज आहेत. यात मला काय फायदा आहे ? मोटारीतून हिंडतो. बॅरिस्टर म्हणून कोगता लाभ आहे ? तुम्ही पडला गरीब. तुमच्या तक्रारी थोड्याच माझ्याकडे येणार आहेत ! तंटे स्पृश्य वर्गाचे. तेच धनवान लोक ! मला पैसा मिळण्याचा संभवही त्याच लोकांकडून आहे. पण मी तुमच्या फायद्यासाठी त्यांच्याशी झगडतो. म्हणून त्यांना माझी

भीती वाटते.

माझ्या पश्‍चात कोण माणसे किती जबाबदारीने काम करू शकतील ? व माझी जबाबदारी कोण घेईल ? मला आशा आहे की काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील. नाहीतर चढणीवर चढलेली गाडी डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर बैलाच्या अभावी घसरून पडते तशी आपली स्थिती होईल. याबद्दल मला मोठी भीती आहे. आज आपण पर्वताच्या उतरणीवर आहोत. चढण चढू लागलो आहोत. आपला अंतिम हेतू अद्याप साधला नाही. यात्रेसाठी निघालो आहोत परंतु अजून देवाला पाहिले नाही. यात्रा संपेपर्यंत आपण सर्वानी पीठ, मीठ वगैरे सामुग्री बरोबर घेऊन चालावयास पाहिजे. आज राजकारणाची भीती वाटत नाही. परंतु राजकारणाच्या घुळवडीमध्ये जो प्रश्‍न आम्ही हाती घ्यावयास पाहिजे तो प्रश्‍न मागे राहिला आहे. आपल्या स्वतःच्या दुष्कृत्यामुळे आपणास जनावराचीही किंमत नाही. कारण तुम्ही गावातील तुकडे मागून खाता व मेलेल्या जनावराचे मांस फाडून खाता. आज राजकारण लढविले तरी त्याचा काय उपयोग ? देऊळ बाहेरून मढविले तर त्याची काय शोभा ? तुम्ही मृतमांस खाणे सोडून दिले तर कोण खाईल ? ते मेलेले जनावर गिधाड व कुत्रा खाईल. यात तुमची काय किंमत आहे ? त्याची तुम्हास लाज कशी नाही ? समजा उद्या जाधव मुख्यप्रधान झाला ही काही अशक्य कोटीतली गोष्ट आहे असे नव्हे, तर त्याला स्पृश्य लोक मान देतील काय? सध्याप्रमाणे ते आरती ओवाळतील काय ? जे जीवन तुम्ही आज व्यतीत करीत आहात ते जीवन तुम्ही बंद केले पाहिजे व स्वच्छतेने नीटनेटके राहावयास पाहिजे.