१७-६-१९३८ राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेवही थांबवू शकणार नाही - Page 209

राजकारणातील आपली प्रगती .. .. . शकणार नाही १७१

'' तुम्ही जर आमचे मृत मांस व तुकडे खाण्याचे बंद करता तर मग आम्ही

काय खाणार ? “ असा प्रश्‍न काही लोक विचारतात, त्यांना मला असे

सांगावयाचे आहे की, समजा या जवळ असलेल्या चितोड गावच्या दोन मुली ते गाव सोडून मुंबईला गेल्या. त्यापैकी एकीने संसाराला फाटा दिला व वेश्येचा

धंदा पत्करला. तिला घडीचा पलंग, तक्या, गाद्या, खुर्च्या, टेबल वगैरे

आहे. एक नोकर आहे. इराण्याच्या दुकानावरुन ती मस्कास्लाईस, खिमा, रोटी माडीवरून मागविते, दिवसातून चार पितांबर नेसते, पावडर लावते, किती सुबक जीवन नाही? दुसरी मुलगी ७ रुपये पगारावर काबाडकष्ट

करते. नवऱ्याला एक किंवा दीड रुपया मिळेल त्याच्यावर गुजराण करते, कथलाच्या गोटाशिवाय तिजजवळ दुसरा दागिना नाही. मीठ भाकरी खाऊन कैक वेळा उपाशीही राहते. तेव्हा या दोन मुलींपैकी तुम्ही कोणत्या मुलीला मान द्याल ? देह विक्रय करुन पितांबर नेसते तिला की जी गरीबीने, दुःखाने गाजलेली व अन्नाला मौताज झाली तिला ? मला वाटते सर्व न्यायी माणसे

पतिव्रता स्त्रीलाच मान देतील. ॒

तेव्हा तुमची पोटाची खळगी भरो न भरो तुम्ही चांगल्या रीतीनेच वागावयासं

पाहिजे. स्वाभिमान, धैर्य, नीती काही आहे किंवा नाही ? आम्ही जे करतो

ते बरे, वाईट, न्याय, इभ्रत याच्याकडे लक्ष देऊन आपण करतो किंवा नाही

याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही येथून सभेतून गेल्यावर नवीन कार्यक्रमास

सुरवात करावी. (स्त्रियांस उद्देशून) इतर स्त्रियांप्रमाणे तुम्हीही आहात. आम्ही

तुमचे दूध पिऊन वाढलो आहोत. इतर स्त्रियांची मुले मामलेदार, हायकोर्ट

जज्ज आहेत आणि तुमची मुले गुराखी आहेत. याचे कारण तुम्ही नरकात गुंतला

आहात. हे तुमचे पाप आहे. तुमचे वर्तन असेच अशुद्ध राहिले तर तुमची मुले

ही अशीच राहतील ' नर करनी करे तो नर का नारायण बने. ' इतर स्त्रिया काही

देवावतार नाहीत. त्याही स्त्रियाच आहेत, त्यांना वाव आहे. तुम्हाला वाव

नाही. म्हणून तुम्ही सर्वानी स्वाभिमानाने व धैर्याने वागावयास शिका. आपले

अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. |

असे उपदेशपर दीड तास डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर श्री. पुनाजीराव

लळिंगकर यांनी सर्वांचे आभार मानल्यावर सभा ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की

जय !' अशा गजरात बरखास्त झाली. |