१३८
जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला
तारीख १७ जून १९३८ रोजी सकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चाळीसगाव स्टेशनवर उतरले तेव्हा त्यांच्या स्वागताकरिता प्रचंड लोकसमुदाय जमला होता. जयघोषांची एकसारखी गर्जना चालली होती. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरताच अस्पृश्योद्धारक बोर्डिंगचे सेक्रेटरी श्री. डी. एम. मागाडे यांनी बोर्डिंगतर्फे हार अर्पण केला. नंतर डॉ. बाबसाहेब धुळ्याच्या गाडीत बसले. स्त्रियांतर्फ कु. शांताबाई दिवाण चव्हाण यांनी व पिंपरखेड येथील क्रेडीट सोसायटीतर्फे सोमा संसारे यांनी हार अर्पण केले. स्टेशनवर मे. डी. जी. जाधव, बी. ए., एम. एल. ए., शामराव कामाजी जाधव, डिस्ट्रीक्ट लोकल बोर्ड मेंबर, जळगाव, श्रावण धर्माजी जाधव, म्युनिसीपल कौन्सिलर, चाळीसगाव, दिवाण सीताराम चव्हाण, धावजी पहिलवान, भापु मुकादम, उबाळे, आडंगळे, तात्याबा पवार, श्रीपत पवार, सीताराम आव्हाड वगैरे मंडळी व खेड्यातील जनता जमली होती.
डॉ. बाबासाहेब साडेसहा वाजता धुळ्यास कोर्टाच्या कामाकरिता रवाना झाले. त्यांच्याबरोबर तरुण उत्साही व डॉ. बाबासाहेबांचे एकनिष्ठ सेवक श्री. डी. जी. जाधव व बोडिंगचे सेक्रेटरी डी. एम. मागाडे हे गेलेले होते. कोर्टाचे काम आटोपल्यावर डॉ. बाबासाहेब तारीख १९ जूनं १९३८ रोजी रात्री साडे आठ वाजता चाळिसगावास उतरले. डॉ. बाबासाहेब येताच अतोनात गर्दी झाली. लोकसमुदाय ३-४ हजार जमला होता. डॉ. बाबासाहेब यांनी जेवण घेतल्यानंतर, बोर्डिंग पाहिल्यानंतर बोर्डिंगच्या समोर सभेस सुरवात झाली. कवी बना सखाराम साळुंके यानी पद म्हटल्यावर कु. शांताबाई चव्हाण यांनी भाषण केले. त्यानंतर श्री. दिवाण सीताराम चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ आजची संस्थेची स्थिती समाधानकारक होण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातचे अमृताचे थेंब हे होत. आज ग्रँट १११० रुपये व जागाही मिळून ३५०० रुपयापर्यंत इमारत बांधली गेली आहे. लवकरच शेते बोर्डिंगास मिळणार आहेत. अशी संस्थेची भरभराट ज्यांच्या अमृताच्या थेंबाने झाली आहे. त्यांच्याच हस्ते बोर्डिंगचा उद्घाटन समारंभ पार पाडण्याविषयी आमच्या मंडळाचा विचार ठरला आहे. डॉ. बाबासाहेब लवकरच आम्हास तारीख देतील अशी विनंती
जनता : १६ जुलै, १९३८.