१७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अंगवळणी पडली आहे. धुळ्याची गोष्ट सांगतो. धुळ्याचे पाठक शास्त्री हिंदुधर्म-शास्त्रज्ञ आहेत. ' अस्पृश्यांची पूर्वोक्ती ' म्हणून पुस्तक लिहिले आहे. काही कामाकरिता शास्त्रींची भेट घेण्याचा निश्चय केला. पाठक शास्त्रीना मी ९, १० वाजता आपणाकडे भेटावयास येईन असा निरोप पाठविला. मी मोटार घेऊन पाठक शास्त्रींकडे गेलो. एका इसमाजवळ, मी आलो आहे, येऊ काय असे सांगितले. तेथे जेवण चालले होते. शास्त्रींचा निरोप आला नाही, ते धावत बाहेर आले. मी त्यांना सांगितले की, आपल्याशी चर्चा करावयाची आहे. पाठशाळेत चला. त्यांनी सांगितले की, आपण मोटारीतच चर्चा करू. धुळ्याचे रस्ते अरूंद त्यामध्ये जास्तवेळ मोटारीत बसून चर्चा करणे योग्य नाही म्हणून पुष्कळ आग्रह केला. पण उपयोग झाला नाही. नाइलाजास्तव बंगल्यात जाऊन चर्चा करणे भाग पडले. त्याने चांगली चर्चा केली. माझ्यासारखे शिक्षण घेणारी माणसे थोडी असतील. परंतु माझ्या सारख्यांना शास्त्रींच्या पाठशाळेत शिरकाव करता आला नाही. किती अपमान! माझ्या हृद्याला घरे पडतात. तुम्हाला त्याची जाणीव नाही. आपणाला जे काही मिळवून घ्यावयाचे असेल ते झगडा करून मिळेल. काँग्रेस, गांधींचे धोरण ११ महिन्यात चांगलेच दिसले आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा नागपूरचे ना. शरीफ याचे प्रकरणच देईल. यासाठी आपण सर्वांनी संघटना करून सामर्थ्य एकवटून तोंड दिले पाहिजे. काँग्रेस ही ५० वर्षांची आहे. स्वतंत्र मजूर पक्ष दीड दोन वर्षाचा आहे. काँग्रेसला जर कोणाची भीती वाटत असेल तर ती स्वतंत्र मजूर पक्षाची होय. आम्ही १५ माणसे काँग्रेसला भंडावून सोडतो. १५ च्या ऐवजी ३० अगर ४५ माणसे असती तर आपलेच राज्य आले असते. १०-१५ वर्षात एकी केली तर खात्रीने सांगतो की, आपलेच राज्य होईल. तुम्ही सर्वजण मला देव म्हणता. मी देव नसून महार आहे. तुमचा स्वतंत्र मजूर पक्षच देव आहे. धोंड्याला शेंदूर लावला म्हणजे देव-होतो तसा मी आहे. तुमचा खरा देव स्वतंत्र मजूर पक्ष आहे. सर्वानी स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे. वर्षाचे
४ आणे देण्यास जड नाहीत. मी पुष्कळ बोललो आहे. इतके भाषण
झाल्यानंतर डी. एम. मागाडे यांनी बोर्डिंगतर्फ हार अर्पण केला. धावजी याने व्यायाम शाळेतर्फे हार अर्पण केला. हरिभाऊ कन्नडकर यांनी निजामस्टेटतर्फे हार अर्पण केला. भगिनीतर्फे कु. शांताबाई चव्हाण हिने हार अर्पण केला. शेवटी डी. एम. मागाडे यांनी सर्वाचे आभार मानून सभा बरखास्त करण्यात आली. . नंतर सकाळच्या गाडीने डॉ. बाबासाहेब मुंबईस रवाना झाले.