१३९
महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ?
गेल्या ता. ४ ऑगस्ट १९३८ रोजी मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या काही चाहत्या मित्रांनी येथील भारत सेवक समाजाच्या दिवाणखान्यात एक मेजवानीचा प्रसंग घडवून आणला. या स्वागतप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचारपरिप्लुत भाषण केले व लोकशाहीच्या खऱ्या कल्पनांची व तत्त्वांची जी उत्तमप्रकारे फोड करून सांगितली तिचे सध्याच्या काळी प्रत्येक व्यक्तीने मनन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे श्री. तुळजापूरकर व डॉ. खरे यांचीही या प्रसंगी भाषणे
झाली.
या समारंभाला श्री. ना. म. जोशी, डॉ. गोपाळराव देशमुख, डॉ. वाड, डॉ. बालिमा व मुंबईतील प्रतिष्ठित डॉक्टर्स, वकील व नागरिक हजर होते. मेजवानीनंतर सभेच्या कामाला सुरवात करून डॉ. आंबेडकर यांचे नाव अध्यक्षपदाकरिता सुचविताना श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांचे भाषण
झाले.
यानंतर श्री. दळवी यांनी अध्यक्षपदाच्या सुचनेला पाठिंबा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारुन आपल्या भाषणास प्रारंभ केला. ते
म्हणाले,
आपण जे आज येथे जमलो आहोत, ते खरे यांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने
हे सर्वांना ठाऊकच आहे. हे स्वागत करण्यास आपण कोणत्या कारणांनी व हेतुंनी उद्युक्त झालो याचे थोडेसे सविस्तर स्पष्टीकरण करणे जरुर आहे. आजच्या
या सभेतील मंडळींकडे नजर फेका. आपण सर्व एकाच भावनेने अथवा एकाच
कारणाने ह्या स्वागतासाठी येथे जमा झालो आहो असे वाटत नाही. राजकारणातील
मतांच्या दृष्टीने फार तर आजचा हा जमाव अनेक जिनसीच असलेला दिसून
येत आहे. काहींनी तर विशिष्ट पक्षाच्या, काँग्रेसच्या राजकीय विचारसरणीची ` खूण पटविण्याचा पोषाखही केला आहे. हिंदुस्थानातील पुष्कळ हिंदूंना हाच
फक्त एक जगन्मान्य पंथ वाटत आहे. इतर काही लोक जे येथे आले आहेत
ते माझ्याप्रमाणे देशातल्या आजच्या त्या अग्रगण्य पक्षाचे सदस्य नाहीत. उलट
त्यांचा त्या पक्षाला विरोधच आहे. याखेरीज हे इतर काही जण येथे उपस्थित न नामा TN न रा
विविध वृत्त: १४ ऑगस्ट १९३८.