४-८-१९३८ महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? - Page 218

१८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ताकीद दिल्याप्रमाणे मत नोंदावे आणि मग लाथेच्या ठोकरीसरशी परत पिंजऱ्यात जाऊन पडावे एवढेच त्याचे काम. वर्किंग कमिटीने पुकारलेल्या तत्त्वांचा अर्थ हा असा आहे.

मुख्यप्रधानाच्या मूलभूत हक्कांसाठी डॉ. खरे भांडत आहेत म्हणूनच त्यांचे स्वागत मी करीत आहे आणि या त्यांच्या लढ्यात त्यांना सर्वांनी पाठिंबा देणे कर्तव्यच आहे. आता शेवटी एकदोन सर्वसाधारण मुद्याच्या गोष्टी सांगून मी आपले भाषण पुरे करणार आहे. ह्या गोष्टी सांगताना डॉ. खऱ्यांच्या काही विधानांचा मला उल्लेख करावा लागणार आहे. त्याबद्दल ते मला क्षमा करतील अशी आशा आहे. ' आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत, काँग्रेसमध्येच राहून आपल्याला ज्या टोळक्याने इतक्या नीच रीतीने वागविले त्या टोळक्याशी आपण दोन हात करणार आहोत. “ असे डॉ. खरे सांगत आहेत. अर्थात त्यांनी तसे केले तर आमचे काही म्हणणे आहे अशातली मुळीच गोष्ट नाही, पण या कामात त्यांना कितीसे यश मिळेल याची मात्र मला शंकाच वाटते. डॉ. खरे प्रधानमंत्री होते त्या वेळी त्यांच्या हातात अधिकार होता, मध्यप्राताचे मुख्यप्रधान म्हणून जनतेच्या दृष्टीने मानाचे वैभव त्यांना प्राप्त झाले होते, पण इतक्या गोष्टी हाताशी असता त्या वेळीही वर्किंग कमिटीच्या विरूद्ध त्यांना काही करता येणे शक्य झाले नाही. मग आता केवळ एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सभासद म्हणून राहून त्यांना तीच गोष्ट साध्य करून घेता येणे कसे शक्य होईल हे मला समजत नाही. पण काही लोक असे असतात की, अधिकार स्थानावर असल्या वेळेपेक्षा स्थानभ्रष्ट झाल्यावेळीच त्यांचे धैर्य द्विगुणित होत असते. डॉ. खरे हेही अपवादात मानलेल्या व्यक्तिपैकी असू शकतील.

मी येथे राजकीय प्रचारासाठी बोलत नाही अथवा आमच्या स्वतंत्र मजूर पक्षासाठी सभासद मिळविण्यासाठीही मला प्रचारकार्य करावयाचे नाही. तथापि, एक गोष्ट मात्र मला अगदी स्पष्ट व मन:पूर्वक सांगाविशी वाटते ती ही की, तुम्हाला जर लोकशाही हवी असेल तर दोन गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत.

लोकशाहीला जरुर असलेली पहिली गोष्ट पक्षपद्धती ही होय. यापैकी एक पक्ष अधिकारारूढ तर दुसरा विरोधी असला पाहिजे. विरोध करणारा पक्ष अस्तित्त्वात नसेल, तर देशाच्या कारभारात जनता लक्ष घालू शकणार नाही.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एवढेच नव्हे, पण परवाच स्टेट्सूमन नावाच्या एका इंग्लिश मुत्सद्याने असे म्हटल्याचे मला आठवते की, - एखाद्या प्रश्‍नाला दोन बाजू आहेत असे दाखविणे हेच राजकारणी पुरुषाचे काम किंबहुना