१८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सुलतानांचीच सत्ता आपल्यावर चालत आली. आपले भवितव्य इतरांच्या हातात देऊन स्वस्थ बसणे हे आपले आतापर्यंतचे वैशिष्ट्य. आपले धनी हा आपला देव आणि त्याची पूजा करीत राहणे हाच आपला धर्म, हेच वैशिष्ट्य सध्याही प्रस्थापित होऊ पाहत आहे. मालकाचेच म्हणणे खरे, त्याच्याविरूद्ध टीका करणे आपले काम नव्हे, अशी मतदारांची वृत्ती व्हावयासही हेच वैशिष्ट्य कारण आहे. पण अशा अंधभक्तीने जबाबदार राज्यपद्धतीला मात्र गोड फळे कदापि येऊ शकणार नाहीत. पण जबाबदार राज्यपद्धती नांदावयाची तर सरकारची कसोटी पाहण्यासाठी एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे सहजपणे वळण्याची तयारी असलेल्या लोकसमुदायाची प्रथमतः गरज असते. असा लोकसमुदाय निर्माण झाला नाही, तर असा प्रकार घडून येईल की, ब्रिटिशांकडून जी काही सत्ता आपण मिळवू शकू , ती बहुजन समाजाच्या हाती न जाता एखाद्या टोळक्याच्या हाती जाईल आणि पूर्वपिक्षाही वाईट परिस्थिती ओढवल्याचे प्रत्ययाला येईल. ह्यापेक्षा आणखी अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही. शेवटी मी डॉ. खऱ्यांना एवढेच सांगतो की, आम्ही आज येथे बहुजनसमाजाला राजकीयदृष्ट्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या असलेल्या अशा ह्या प्रश्नाबाबत त्यांना शक्य त्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी जमलो आहोत. पक्षविशिष्ट राजकारणाच्या कक्षेबाहेरचा सर्वसामान्य असा हा प्रश्न आहे व म्हणून साऱ्यांचा त्याशी. संबंध पोचत आहे. डॉ. खरे यांच्या या लढ्यात त्यांना पूर्ण यश मिळो असे मी इच्छितो.
डॉ. आंबेडकरांच्या भाषणानंतर डॉ. खरे यांनी उत्तरादाखल भाषण केले.
यानंतर श्री. ना. म. जोशी यांनी छोटेसे भाषण करून आभारप्रदर्शन केल्यानंतर
समारंभ समाप्त झाला.