५-८-१९३८ घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली पाहिजे - Page 224

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन १८६

संकटाच्या वेळी आश्रय देणारे आई-बाप झाले शत्रु. परंतु मुलीची सासू होती कजाग, तिचा एळकोट जाईना. दुर्दैवाने ह्या मुलीला मूल होईना. झाले निमित्त एक दिवस ती मुलाला म्हणाली की, तू आता दुसरे लग्न कर. मुलीच्या आई-बापांना मोठा प्रश्‍न पडला. मुलीला पुन्हा आपल्याकडे आणावी तर ती इतकी बेवकूब की, पुन्हा म्हणणार मी जाते आपल्या सासरी. म्हणून त्यांनी तिच्याकडे लक्ष पुरविले नाही. नवऱ्याने दुसरे लग्न केले. मागल्या बाईला मूल झाले. सगळ्यांचे लक्ष अर्थात तिच्याकडे. हिची हेळसांड होऊ लागली. शेवटी तिला क्षय झाला आणि काही दिवसांनी झिजून मेली. डॉ. खऱ्यांची परिस्थिती काही अंशी आमच्या शेजारच्या मुलीसारखीच आहे. ' त्यांना काँग्रेसमध्ये जाच झाला, त्यांना अन्याय झाला म्हणून ते महाराष्ट्रात त्यांच्या सगेसोयऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे घेऊन आले आहेत व इतका अन्याय झाला असतासुद्धा ज्याप्रमाणे ती मुलगी सासरीच नांदावयास कबूल, त्याप्रमाणे डॉ. खरे म्हणतात, ' मी आपला काँग्रेसमध्येच राहाणार !* या मुलीप्रमाणे त्यांना झिजवून मारण्याचा प्रसंग येऊ नये म्हणजे झाले !

डॉ. खरे यांना झालेला अन्याय पुसून काढता येत नाही. लोकशाहीची तत्त्वे अशी पुसली जाऊ नयेत हाच विचार या प्रसंगानंतर सर्वांनी केला पाहिजे. ज्या दगडांनी किंवा देवांनी डॉ. खऱ्यांचा बळी घेतला, ते दगड आणखी बळी घेणार नाहीत कशावरून ? डॉ. खऱ्यांचे म्हणणे की, सर्वानी काँग्रेसमध्ये यावे. काँग्रेसमधीलही काहींचे म्हणणे असे आहे की, काँग्रेसमध्ये घाण आहे ती तुम्ही काँग्रेसला मिळून उपसून टाका. यावर माझे म्हणणे असे आहे की, घाण करणार तुम्ही ! अर्थात तुम्ही केलेली घाण तुम्हीच काढली पाहिजे. मी माझ्या स्वच्छ कपड्यांनी येऊन ती घाण का काढू ? तुमची घाण तुम्ही उपसून टाका म्हणजे मग माझ्या स्वच्छ कपड्यांनी काँग्रेसमध्ये यावयाचे किंवा नाही हे मी पाहून घेईन. यातून असा मुद्दा उपस्थित होतो की, एकच राजकीय पक्ष असणे इष्ट आहे काय ? सर्वांनी आपली शेंडी काँग्रेसच्या हातात अडकावी हे चांगले आहे काय ? मला असे प्रामाणिकपणे वाटते की, देशामध्ये एकच पक्ष असणे हे देशाच्या उन्नतीला हितावह नाही. ज्या देशामध्ये एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष नाहीत, तेथे बुद्धीची वाढ होणे शक्य नाही व जेथे बुद्धीची वाढ नाही, तेथे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे.

शेवटी डॉ. खरे यांना मी एक विनंती करणार आहे. कोणी तरी मला सांगितले की, मुंबईच्या प्रभात पत्रात मध्यप्रांत मंत्रिमंडळाविषयी लिहिताना असे लिहिले आहे की, डॉ. खरे हे जात्यात असून मुंबईचे मुख्यप्रधान बाळासाहेब