१९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
गेला आहे. तथापि, त्यांनी विद्यार्थीदशेत कसे वागावे या बाबत माझ्या स्वानुभवाने काहीनाकाही सांगू शकेन. ज्या समाजात गेली हजारो वर्षेपावेतो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलिकडे बी.ए. व एम.ए. वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही ? मागे आपल्या समाजात बी. ए. चा पदवीधर औषधालासुद्धा मिळत नव्हता. मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथम बी. ए. झाला होता. त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी. ए. लिहिल्यास पोस्टमन ते पत्र त्यासच नेऊन देत असत. इतका तो बी. ए. झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता. आज तर आपल्या समाजात अनेक बी. ए. झाले आहेत. इतकेच नव्हे तर विनोदाने बोलावयाचे झाल्यास येथे असलेल्या लोकात जर खडा फेकला तर तो बी. ए. झालेल्यासच लागेल. बी. ए. झालेले जरी काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी आहे की, आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यावयाची आहे ते लोक पुढारलेले आहेत. आजच्या जीवनकलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही नीरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही. कारण आज सर्व सत्ताधारी म्हणून पुढारलेलेच वर्ग आहेत. नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफीसात गेल्यास तेथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघडे नागडे सत्य आहे. नुसत्या बी. ए. होण्यामुळे तुम्हास नोकरी मिळणार नाही. पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्रा शिक्षणाचे चीज होणार नाही. अगर पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत. उलट आज शेकडो वर्षे जसे आपणास व आपल्या बापजाद्यांना त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर बी. ए. झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा. मी प्रथम बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारडा बॅरिस्टर म्हणून मला हिणवणीने पुढारलेल्या वर्गाचे बॅरिस्टर म्हणत असत. परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत.
आपणास चांगले दिव्य केल्याशिवाय महत्त्व येत नाही. इतर समाजाचे तसे. नाही. ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कोठे इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील आणि त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्यास सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे. हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे. आपण असे पहा की जर एखाद्या महारीन अगर मांगीन अगर चांभारीन बाईने सोन्याचें दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असा समज उच्च म्हणविणारे वर्ग करून घेत असतात. तद्वतच