२०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
म्हणजे काय ? युनायटेड स्टेट्स्च्या राज्यघटनेत ' गुलामगिरी म्हणजे सक्तीची मनाविरूद्ध करावी लागणारी नोकरी ' अशी गुलामगिरीची व्याख्या सापडते. संपाकरिता कामगारांना शिक्षा करणे म्हणजे त्यांना गुलाम असे मी म्हणतो. संप बेकायदा ठरविणे म्हणजे त्यांना त्यांच्या मनाविरूद्ध काम करावयास लावणे. एखाद्याला मनाविरूद्ध काम करावयास लावणे म्हणजेच त्याला गुलाम बनविणे हे नीतितत्त्वांच्या विरूद्ध आहे. ते कायद्याच्या विरूद्ध आहे. जेव्हा ४९०, ४९१, ४९२ ही कलमे बनविण्यात आली, त्यावेळेस कामगारांच्या स्वातंत्र्यावर ही बंधने जरी क्षुल्लक स्वरूपाची होती तरी ती घालणाऱ्यांना आपण करतो ते बरोबर आहे किवा नाही याची शंका वाटत
होती.
कामगारांना संप करण्याचा हक्कच मुळी नाही असे सांगण्यात येत आहे परंतु ह्याला माझे उत्तर असे आहे की, जो मनुष्य असे म्हणू शकतो त्याला संप म्हणजे काय हेच कळले नाही. संप म्हणजे नोकरीचा करार भंग करणे असा जर अर्थ धरला तर संप हे स्वातंत्र्याच्या हक्कालाच दिलेले दुसरे नाव आहे असे कबूल करावे लागेल. तुम्ही जर प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हकक आहे असे कबूल करता तर प्रत्येक कामगारांला संप करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कबूल केले पाहिजे. स्वातंत्र्याचा अधिकार हा दैविक अधिकार आहे असे जर आपण कबूल करता तर मग संप करण्याचा प्रत्येक कामगाराचा अधिकार दैविक आहे हे तुम्हाला कबूल करावे लागेल.
काँग्रेस सरकारचा ट्रेड्स् डिस्प्यूट बिल आणण्यात संप बेकायदेशीर करून “ संप करणे ' हा गुन्हा ठरविण्याचा प्रयत्न आहे व यापूर्वीच्या कोणत्याही कायद्याने संप बेकायदेशीर ठरू शकत नाहीत हे दाखविताना डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले,-
“ कामगारांचा संप हा कोणत्याही कायद्याने बेकायदेशीर ठरू शकत नाही. अशा वेळी मला इं. पि. कोडच्या १२०-अ कलमाची आठवण करून देण्यात येईल. १२०-अ हे कट करणाऱ्यास शिक्षा सांगणारे कलम आहे. संप म्हणजे कामगारांच्या संघाने केलेला एक कट आहे असे धरून चालून ह्या कलमाच्या आधारे कामगारांना संप करण्याचा हक्क नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न विरूद्ध पक्षातील काही जणांकडून होण्याचा संभव आहे. तेवढ्याकरता त्यांना ' संप करणे ' म्हणजे ' कट करणे * होय असे प्रथम सिद्ध करावे लागेल परंतु ' संप ' हा ' कट ' ठरूच शकत नाही.