१५-९-१९३८ कामगारांवर गुलामगिरीची बंधने लादणे हे लोकशाहीचे विडंबन - Page 254

२१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

श्री. दशरथ पाटील, भाई जयवंत वगैरे पुढारी मंडळींची भाषणे झाल्यावर

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सुरू

झाले.

त्यांनी प्रथम जमलेल्या असंख्य कामगारांच्या एकजुटीबद्दल आनंद प्रदर्शित

केला आणि ते पुढे म्हणाले,

आज येथे येऊन कामगार पुढाऱ्यांपुढे व माझ्या कामगार बंधुभगिनींपुढे

बोलण्याचा जो हा योगायोग आला आहे तो माझ्या दृष्टीने अपूर्व असा आहे. ज्या

बिलाचा जाहीर निषेध करण्याकरिता आपण सर्वजण जमला आहात त्या

बिलासाठी मी असेंब्लीमध्ये एकदा माझे मत जाहीर करून या अन्यायमूलक

कायद्यासंबंधीच्या काँग्रेस सरकार धोरणाचा चांगलाच समाचार घेतला

आहे. त्यानंतर या बिलाबाबत मला अधिक वेळ खर्च करून असेब्लीमध्ये कार्य

करता आले नाही. मला खरोखरच खेद वाटतो. परंतु ती सारी लढाऊ स्वरूपाची कामगिरी माझे मित्र बॅ. जमनादास मेहता यांनी योग्यरितीने बजावल्यामुळे, या परिषदेमध्ये मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. हे बिल कामगारांच्या स्वातंत्र्यावर व एकंदर हितसंबंधावर कसे गदा आणणारे आहे, हे चालू असेब्लीमध्ये या बिलाच्या चर्चेच्यावेळी कामगार प्रतिनिधींनी काँग्रेसच्या नजरेस आणण्याचा कसून प्रयत्न केलेला आहे.

आजच्या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या बिलाविषयी असंतोष व्यक्‍त करण्याकरिता जो एक दिवसाचा सार्वत्रिक संप पुकारण्याचा संकल्प केला आहे, त्याला माझी पूर्णपणे अनुमती आहे. अशारितीनेच कामगारांनी स्वतःच्या संघशक्तीच्या बळावर या घातुक बिलाला हाणून पाडण्याचा प्रयत्न करणे केव्हाही हिताचेच ठरेल. या देशात सन १८५० पासून गिरण्या, कारखाने वगैरे प्रकारच्या धंद्यास सुरूवात झाली. त्यावेळेपासून हजारो संप झाले. त्यावेळी त्यांच्या या न्याय्य शस्त्राविषयी कुणीही आडकाठी उत्पन्न केली नाही. गुलामगिरीवर प्रकाश पाडणारे संपासारखे हत्त्यार अधिकाराच्या बळावर नोकरशाहीने सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि आज कामगारांची पाठीराखी म्हणविणारी, गुलामगिरीचा धिक्कार करून स्वतःची वल्गना करणारी काँग्रेस तिच्या मुंबई असेंब्लीच्या मंत्रिमंडळाकडून या उज्ज्वल तत्त्वास काळीमा फासून ट्रेड डिस्प्यूट बिलासारखा काळा कायदा कामगारांच्या मानेवर ठेवीत आहे. कोणत्याही सरकारने जनतेला न आवडणारे कायदे केले तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी असहकारितेसारखा लढा लढविणे आवश्यक आहे, अशी काँग्रेसचे पंचप्राण गांधीजी यांनी जी शिकवण या देशातील बांधवांना दिली आहे तिचा