१४४
माझी महात्माजींची भेट झाली तेव्हा-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अहमदाबादेस येणार हे कळल्याबरोबर अहमदाबादच्या काही काँग्रेस श्रेष्ठींच्या अंतःकरणाची तगमग होऊ लागली आणि वाटेल ते करून त्यांच्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून टेलिग्राम-टेलिफोनद्वारा मुंबईशी बरीच गुफ्तंगू झाली. त्याचा काहीच उपयोग न होता ते येणारच असे पाहिल्यावर खुद्द अहमदाबादेत त्यांचा धिःकार आणि निषेध करण्याचे निष्फळ प्रयत्न झाले.
ता. २२-२३ ऑक्टोबर १९३८ या दोन दिवसांच्या अहमदाबाद येथील मुक्कामात डॉक्टरांच्या सत्कारांचे आणि व्याख्यानांचे निदान पंधरा तरी समारंभ झाले असतील. त्यांचे सगळेच कार्यक्रम चढाईचे दणदणीत झाले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीच्या प्रेमाभाई हॉलमधला समारंभ चालू राजकारणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा झाला. त्या ठिकाणी दलित नवयुवक मंडळाच्यावतीने मिळालेल्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी जे भाषण केले ते अतिशय जोरदार, कळकळीचे आणि अत्यंत उद्बोधक होते. त्यातला काही भाग नमूद होऊन सर्वाच्या वाचण्यात येणे फार महत्त्वाचे आहे.
आपण गांधींचे विरोधी आहो आणि आपण काँग्रेसला येऊन मिळत नाही या दोन आरोपांना उत्तरे देताना ते म्हणाले, |
माझ्यावर असा आरोप आहे की, मी गांधींचा विरोधक आहे. मी त्यांना मानीत नाही. अगदी खरे आहे. मी गांधींचा विरोधकच आहे आणि ही गोष्ट मी गुजरातच्या या पाटनगरात, गांधीवादाच्या बालेकिल्ल्यात आपणा सर्वांच्या समक्ष जाहीर रीतीने सांगतो. हे सांगताना मला बिलकूल दिक्कत वाटत नाही. मला हे ठाऊक आहे की, गांधींच्या विरूद्ध बोलणे ही गोष्ट हलकी-सलकी नाही. आज कोट्यावधी लोक त्यांना अवतारी पुरूष मानीत आहेत. जगापुढे ते हिंदुस्थानचे एकमेव प्रतिनिधी म्हणून मिरवीत आहेत. ते साधू , महात्मा समजले जात आहेत. गांधींच्या पायाशी गोंडा घोळून त्यांच्यापुढे ' जी हुकूम ' करण्यात काय फायदा होतो हे काय मला ठाऊक नाही ? सुभाष बोसकडेच
चित्रा : ६ नोव्हेंबर, १९३८.