२२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
काही सांगावयाचे होते ते मी सांगितले. माझे बोलणे चालू होते, गांधींचा चरखा चालू होता. मी दीड तास तिथे होतो. तेवढ्या अवकाशात गांधी एक शब्दही माझ्याशी बोलले नाहीत. शेवटी त्यांचे चरख्याचे चक्र थांबल्यानंतर आम्ही उठलो. तेव्हा गांधी मला एवढेच म्हणाले, ' मी तुमचे बोलणे ऐकले आहे. मी त्याचा जरूर विचार करीन. ' मी निघून आलो.
पुढे एकदा निरोप आला की गांधींनी सर्व अल्पसंख्य प्रतिनिधींना बोलावले आहे. आम्ही सगळे गोळा झालो. तिथे मग नामदेवाच्या लग्नात जरी एकाने व्याह्याकडच्या प्रत्येक माणसाला विचारले होते, ' तुम्हाला काय पाहिजे ' ' तुम्हाला काय पाहिजे ' तसे गांधींनी आमच्यापैकी प्रत्येकाला विचारले. ज्यांनी त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. सगळे ऐकून घेऊन गांधी संथपणे म्हणाले. ' मी तुमचे म्हणणे ऐकले आहे, मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आहे. मला अस्पृश्यांना काही द्यायचे नाही. '
अल्पसंख्य प्रतिनिधींची (मायनॉरिटी कमिटीची) रीतसर बैठक भरली. रॅम्से मॅकडोनाल्ड अध्यक्षस्थानी होते. कामकाजाला सुरूवात व्हायच्या आधी मुसलमानांनी तहकुबीची सूचना आणली. कारण काय तर त्यांना गांधींशी काही खाजगी चर्चा करायची होती. मी आश्चर्याने स्तंभित झालो. मलाया घटनेचा अर्थच कळेना. मी उठलो आणि तहकुबीला विरोध केला. मी म्हटले, “ जर ही चर्चा अल्पसंख्यांकांच्या हक्कासंबंधी असेल तर ती एकट्या गांधींशी खाजगी काय म्हणून ? तीत आम्हाला बोलावणे का नाही ? खाजगी भेटी-गाठी यापूर्वीही झालेल्या आहेत. जर ही चर्चा अस्पृश्यांच्या मागण्यासंबंधी असेल तर ती आम्हाला वगळून का यासंबंधी गांधींनी आपले म्हणणे स्पष्ट केले पाहिजे. '' त्यावर अध्यक्षांनी गांधींना त्यांचे यासंबंधी काय म्हणणे आहे असे स्पष्ट विचारले तेव्हा गांधी म्हणाले, “ मला स्वतःला अस्पृश्यांना काहीही द्यायचे नाही. पण इतर अल्पसंख्य प्रतिनिधींनी जर अस्पृश्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांना मी विरोध करणार नाही. “ या गोष्टी मी आपल्या मनाच्या सांगत नाही. राऊन्ड टेबल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंग्ज् मध्ये त्या नमूद आहेत. त्या वाटेल त्याला पहायला मिळतील. शेवटी माझ्याविरोधाचा उपयोग न होता सभा तहकूब झाली.
त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, त्यानंतर गांधींनी ज्या काही गोष्टी केल्या त्या माझ्या काळजावर डागल्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच माझी खात्री पटली की गांधी विश्वासघातकी मनुष्य आहे.