२३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
भाषातून बोलणे मला कठीण जाते. अलिकडे मी फ्रान्स व जर्मनीत जेव्हा गेलो
तेव्हा त्या भाषेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला. म्हणून विद्येचा व्यासंग
नेहमी केला पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यावयास लागल्यावर तो
ती जन्मभर पीत राहतो त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे. विद्येची
खरी गोडी कोणाला लागली ? परिक्षेनंतर जो आपली पुस्तके नळबाजारात
विकतो त्याला ? बायकोपेक्षा, पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम आहे त्यालाच
विद्येची गोडी लागली, असे मी म्हणेन. माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जब्ती
आली व बेलिफाने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर त्याला मी गोळी घालून
जागच्याजागीच ठार करीन. मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोडी दिसते. लग्नात मुलगी सुंदर आहे काये? ती आपणास पसंत आहे काय ? वगैरे गोष्टी तुम्ही पाहता. पण तोच हक्क मुलींना द्या. बऱयाच
सुंदर स्त्रिया कुरुप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पाहिल्या आहेत. या देशाचा मला कंटाळा आलेला आहे. परंतु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून मला येथे राहणे भाग पडले. यातील धर्म, सामाजिक रचना, सुधारणा व संस्कृती यांचा मला फारच कंटाळा आलेला आहे. ।am at war with civilization येथील कोट्याधीश मारवाड्यांच्या घरात काय दिसेल ? त्यांच्या घरात स्टॅच्यू, फर्निचर, पेंटिंग व पुस्तके यापैकी एकही वस्तू दिसणार नाही. हीच गोष्ट ब्राह्मणांची. एखाद्या ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यावर तो आपल्या बायकोस एखादी सोन्याची पुतळी करण्याच्या गडबडीत असतो. कारण सोने संकटसमयी उपयोगी पडते ना ! जगात फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशु आणि माणूस यात फरक काय ? मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो, पशुला ते करता येत नाही. नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौंदर्य वाढत नाही. मी आतापर्यंत दहा-अठरावेळा विलायतेस गेलो. माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेस आले होते. त्यांना आता मी पाहतो तो काय, त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य ! त्यांच्यावर काहीएक परिणाम झालेला आढळत नाही. काय त्यांचा जन्म! हिंदू धर्मातील सर्व घाण त्यांना मान्य ! तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात. अत्यंत घाणेरड्या पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे. तुमच्या आईबापांना शिक्षण नाही. अठराविश्वे दारिद्र्य. तेव्हा हा मैल साफ करणे हे तुमचे कर्तव्य आहे. बायबलात मी वाचले आहे की मीठच जर अळणी झाले तर बाकी पदार्थांना चव कशी येणार ! कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजेत आणि ते स्थिरावण्याकरिता निदान एक पिढी तरी लोटली पाहिजे. स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकविणार ? सुधारणेचे मूळ वंशपरंपरा रुतले गेले पाहिजे. तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.