स्वातंत्र, माणुसकी .. .... तेच स्वराज्य २४१
ना. खेरांना गुजरातेत एका समारंभाला बोलावून त्यांचा वल्लभभाईनी भयंकर अपमान केला ! “ मुख्यप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला बोलाविले नाही तर तुम्ही गांधींचे भक्त आहात म्हणून बोलाविले, नाही तर हाकलून लावले असते ! “ असे | बोलून वल्लभभाईने एका महाराष्ट्रीयाचा भयंकर अपमान केला आहे ! आमच्या नामदार खेरांच्या या अपमानाचा सूड कोण घेणार ? त्याचा सूड मी घेईन. माझ्याविषयी असे उद्गार काढू दे की, त्या वल्लभभाईला मी जोड्यांनी । मारीन ! त्यांच्या सभेत मी जातो. ताकत असेल तर त्यांनी माझ्या सभेत यावे.
एक-दोन महिन्यात खोती बील चर्चेला निघेल, पण ते बील पास होणार नाही. काँग्रेसचे राज्य उलथून पाडल्याशिवाय हे होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षाचे, शेतकरी कामकरी पक्षाचे राज्य झाल्याशिवाय हे होणार नाही. खोत बेकायदेशीरपणे कुळांना लुटतात, त्यांचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. कबुलायतीचा फॉर्म स्वतंत्र मजूर पक्ष तयार करणार आहे, तो तयार झाल्यावर त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. सर्व अधिकारीवर्ग खोतांच्या जातीचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षपात होत असता तुम्ही तुरुंगाची भीती बाळगू नका. तेथे घरच्यापेक्षा वाईट काहीच नाही. आम्ही तुमच्याबरोबर तुरुंगात येऊ पण तुमचा तुरुंगवास म्हणजे गांधींचा तुरुंगवास नव्हे. तो तुरुंगवास कसला ! तुरुंगात रोज त्यांना अत्यंत प्रिय असे शेळीचे दूध, फळे, अंजीर, मोसंबी वगैरेच्या करंड्याच्या करंड्या त्यांच्याकरिता तयार असत ! तुमचा तुरुंगवास यापेक्षा निराळा आहे.
डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड निवडणुका लढवा व आपली माणसे निवडून आणा. सत्तेच्या सर्व जागा काबीज करा.