८-१-१९३९ समता सैनिक दलाचा सैनिक निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे - Page 286

१५२
संस्थानांची पुनर्घटना करून
हिंदुस्थानला व्यापून टाकील
असे नागरिकत्व निर्माण करणे गरजेचे

ता. ३० जानेवारी १९३९ रोजी पुणे येथे गोखले राजकारण-अर्थशास्त्र मंदिराचा संस्थापक दिन साजरा झाला. याप्रसंगी स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खास आमंत्रण देऊन ' हिंदी फेडरेशन ' या विषयावर भाषण करण्याविषयी बोलाविले होते. या आमंत्रणानुसार त्यांनी पुणे येथील गोखले स्मारक मंदिरात भाषण केले. हे भाषण इंग्रजी मध्ये झाले. भाषण ऐकण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी गोखले स्मारक मंदिराकडे लोटली होती. यावेळी श्री. नारायणराव म. जोशी, एम्‌. ए; एम्‌. एल. ए. यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते.

आचार्य धनंजयराव गाडगीळ यांनी डॉ. आंबेडकरांना बोलावयास विनंती करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी लाऊडस्पीकरची योजना केल्यामुळे त्यांचे भाषण सर्वांना ऐकावयास मिळाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले भाषण लिहून आणले होते परंतु ते सर्वच वाचून दाखवणे अशक्य असल्यामुळे त्यातील मुख्य मुद्दे वाचून बाकीचे भाषण. सारांश रुपाने निवेदन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

सभ्य स्त्री-पुरुषहो,

आजपर्यंत विद्यार्थी वर्गाकडून मला आलेली व्याख्यानांची आमंत्रणे अनेकदा नाकारावी लागलेली आहेत. अशास्थितीत या संस्थेच्या निमंत्रणाचा स्वीकार मी केला, ही गोष्ट एकप्रकारच्या विषमतामूलक भेदाभेदांची निदर्शक आहे, असे वाटण्याचा संभव आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ता या नात्याने मला माझी कामे सांभाळून अशा निमंत्रणांचा स्वीकार करणे कठीण जाते. मी राजकारणी आहे, नुसता अध्यापक नाही. अध्यापक हा एकप्रकारे विद्यार्थी असतो. राजकारणी लोक नुसते चळवळेच असतात.

जनता : ४ फेब्रुवारी १९३९.