३०-१-१९३९ संस्थानांची पुनर्घटना करून हिंदुस्थानला व्यापून टाकील असे नागरिकत्व निर्माण करणे गरजेचे - Page 290

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २५२

माझे भाषण फार लांबले, ते संपविण्यापूर्वी मला एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. पूर्वी हिंदुस्थानच्या राजकारणातील नेतृत्व रानडे, टिळक, आगरकर, गोखले, दादाभाई, फिरोजशहा मेहता, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी अशांसारख्या नामांकित लोकधुरीणांच्या हाती असून ते जुने पुढारी नीटनेटका पोषाख करीत आणि अभ्यास करुन बोलत. आज ती प्रथा बदलली आहे. आज अर्धनग्न राहाण्यात लोकधुरीणांना अभिमान वाटतो आणि राजकीय घटनांचा अभ्यास न करता त्यावर मते प्रदर्शित करण्यासही ते मागेपुढे पाहात नाहीत. कारण त्यांचा आधार ग्रंथापेक्षा आतल्या आवाजांवर अधिक असतो. मला तशी प्रसाद- दीक्षा लाभलेली नाही. मला आतल्या आवाजाचा अनुभव नाही म्हणून मी रानडे टिळक, गोखले यांच्या परंपरेला अनुसरून चालणाऱ्या रा. ब. काळे यांच्या स्मृतिदिनाच्या या सभेत आज हे आपले विचार या पद्धतीने आपणापुढे मांडले आहेत, त्यातील जो भाग ग्राह्य वाटेल तो आपण स्वीकारावा, अशी आपणास प्रार्थना करुन मी आपले भाषण संपवितो. (प्रचंड टाळ्या)

श्री. ना. म. जोशी, डॉ. आंबेडकर यांचे आभार मानताना म्हणाले की, ““ डॉ. आंबेडकर हे माझे एलफिन्स्टन कॉलेजातील शिष्य होते, याबद्दल मला फार अभिमान वाटतो. स्वतंत्र बुद्धीने विचार करुन आपली मते धैर्यशालीपणाने पुढे

मांडणारे त्यांच्यासारखे मार्गदर्शक तरुणपिढीला अवश्य मिळाले पाहिजेत. मुंबईहून येथे येण्याची त्यांनी तसदी घेतली याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.” पुष्पहार समर्पण करण्यात आल्यावर सभेचे काम संपंले