३०-१-१९३९ संस्थानांची पुनर्घटना करून हिंदुस्थानला व्यापून टाकील असे नागरिकत्व निर्माण करणे गरजेचे - Page 291

१५३

दारूबंदीपेक्षा शिक्षणाचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा

मंगळवार ता. २१ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी, स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करणार असल्याचे कळताच, प्रेक्षक गॅलरीमध्ये बरीच गर्दी झाली होती. स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रमुख कार्यकर्तेही हजर होते.

- प्रश्‍नोत्तरे व नंतर आदले दिवसाचे श्री. बांद्रेकर याचे बजेटवरील शिल्लक राहिलेले भाषण संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. त्यांनी आपल्या भाषणात प्रथमतः सांगितले की आजचे काँग्रेस सरकारचे अंदाजपत्रक जरी तिसरे असले तरी माझ्या मते ते पहिले आहे. कारण पहिली दोन्ही अंदाजपत्रके तयार करताना काँग्रेसला आपल्या परिस्थितीसंबंधी नक्की अंदाज करता येण्यासारखा नव्हता व त्यावेळी, परिस्थितीही निराळी होती. परंतु या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या बाबतीत त्यांना मुबलक वेळ व त्याची उभारणी करण्यास सर्वतोपरी साधने आणि विचार करण्यास संधी मिळालेली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता आजचे अंदाजपत्रकच पहिले असे समजतो. अशाप्रकारे अंदाजपत्रकासंबंधी प्रस्तावना केल्यानंतर, डॉक्टरसाहेब अंदाजपत्रकाकडे वळले. अगदी प्रथमतःच त्यांनी हे अंदाजपत्रक जमेच्या बाजूने “ बेजबाबदार आणि खर्चाच्या बाजूने नादानपणाचे आहे “ असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी अंदाजपत्रकाची कलमवार चर्चा करण्यात सुरवात केली. त्यांनी प्रथमतः अंदाजपत्रकात ज्यांच्यावर कॉंग्रेस सरकारने कर बसविले आहेत त्यांची आपल्या भाषणात पुढीलप्रमाणे विभागणी केली:-

(१) कोर्ट फी व स्टॅम्प्स ड्यूटीवरील कर,

(२) विजेवरील कराची वाढ,

(३) शहरातील घरभाड्यावरील टॅक्स,

(४) मालमत्तेच्या लीजवरील टॅक्स,

(५) मुंबई व अहमदाबाद येथील वरील मालमत्तेच्या भाड्यावर शेकडा १०

टक्के कर,

(६) विक्रीवरील टॅक्स.

जनता : २५ फेब्रुवारी १९३९.