२७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
संरक्षणाकरिता हिंदुस्थान समर्थ नाही. संरक्षण खातेही हिंदी कायदेमंडळाला
जबाबदार करावे अशी गोलमेज परिषदेचेवेळी आम्ही मागणी केली होती. यादृष्टीने
ब्रिटिश सरकारने काहीच केले नाही. इतक्यापुरते आमचे काँग्रेसशी
एकमत आहे. |
दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांना योग्य अशी घटना जेरेमी बेंथम याने तयार करून
दिली पण ती अयशस्वी झाली. कपडा शरीराला उत्तम बसला पाहिजे,
त्याप्रमाणे घटना योग्य असणे हे मुख्य तत्त्व आहे. गृहमंत्री ना. मुन्शी यांच्या किरकोळ शरीराकरिता तयार केलेले कपडे माझ्यासारख्या जाडजुड शरीराला
उपयोगी नाहीत. (हंशा) वाकड्या पायाचा बूट सरळ पायाला बसणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊन लोकशाहीचा विचार केला पाहिजे. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य होय. आज मुसलमान, अस्पृश्य हे अल्पसंख्य आहेत व ते तसेच राहाणार. बहुसंख्य हिंदुंकडून सहनशीलता, समानता व बंधुत्वाची वागणूक मिळेल काय ?
ना. खेर यांनी होकारार्थी मान हालविली या गोष्टीचा उल्लेख करून डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाचे कसे हाल होतात याची उदाहरणे दिली. १९२९ मध्ये अस्पृश्यांच्या परिस्थितीची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या कमिटीचा रिपोर्ट १० वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती ते उत्तम प्रकारे दाखविते असे ते म्हणाले. |
त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीत काही बदल झाला आहे काय ? कायदेभंगाच्या वेळी काँग्रेसने कौन्सिलवर बहिष्कार घातला. ' कौन्सिल में जाना हराम है ' हे त्यांचे त्यावेळी ब्रीदवाक्य होते. त्याचप्रमाणे ' कौन्सिल में कौन जायगा ? धेड जायगा, चमार जायगा ' असेही ते म्हणत असत. (यावेळी काँग्रेस पक्षीय सभासदांनी नाही, नाही अशी ओरड केली.) याबद्दल मी पुरावा देईन. त्यावेळी अखेर टाइम्सला अग्रलेख लिहावा लागला होता. जात विसरलो, धर्म विसरलो अशी फुशारकी मारणाऱ्या या काँग्रेसवाल्यांची ही मनोवृत्ती, मग मनाचा कायदा पूज्य मानणाऱ्या सनातनींचे मत काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.
यानंतर डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य वर्गावर होत असलेले अत्याचार, अन्याय, हाल व जुलूम यांची ५-६ उदाहरणे विस्ताराने निवेदन केली. प्रांतिक राज्यकारभारात बहुसंख्य हिंदुंचे कसे वर्चस्व आहे हे रेव्हेन्यूखात्यातील त्यांनी आकडेवार माहिती देऊन सांगितले ;