१६-१२-१९३९ न्याय्यहक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका ! - Page 322

२८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अवलंबून राहावे लागते, हे सांगणे नकोच. सरकारी कामाबद्दल गावकामगारांना पगार देण्याची जबाबदारी सरकारचीच नाही काय? ही जबाबदारी फेटाळणारे सरकार अन्यायी आहे व अशा अन्यायी सरकारची सेवाचाकरी करणारे महार नादान आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सरकार हे काही महारांचे व्याही, जावई नाहीत, मग त्यांची सेवाचाकरी महारांनी विनावेतन का करावी ? धनी पगार देत नाही तर धन्यास ठोकर मारण्यास नोकरांनी शिकले पाहिजे. या परिषदेच्या द्वारा आपण आज सरकारास सहा महिन्यांची नोटीस देऊ. या मुदतीत सरकारने महार कामगारास योग्य पयार देण्याची व्यवस्था केली तर ठीक, नाही तर विनावेतन काम करणाऱ्या लोकांनी इलाखाभर संप पुकारावयास हवा, असे माझे सांगणे आहे.

` या गावकामगारांनी करावयाच्या १९ कामांची रादी सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून स्वतंत्र मजूर पक्षाने ही कामे महारांवर लादली आहेत, असे श्री. रणखांबे प्रतिपादन करू लागले आहेत. स्वतंत्र मजूर पक्ष मूर्खपणा करीत आहे, तो पक्ष चुकत आहे, असे कोणी म्हणू लागला तर त्याबाबत वादविवाद करून स्वतंत्र मजूर पक्षाला आपले म्हणणे योग्य आहे, असे सिद्ध करण्याचा मार्ग खुला आहे. पण स्वतंत्र मजूर पक्ष हा अप्रामाणिक आहे, असे तुपाच्या लालचीने कोणी प्रतिपादन करू लागला तर तो गृहस्थ हरामखोर आहे, असे म्हटल्याशिवाय गत्यंतरच नाही.

स्वतंत्र मजूर पक्ष अप्रामाणिक असता तर राजकारणात बहुसंख्य असलेल्या काँग्रेस पक्षाशी त्याने उघडपणे, छातीठोक विरोध केला नसता. गांधी पक्षाला मिळणे, त्या पक्षाची खुशामत करणे याला काही विशेष प्रामाणिकपणा अंगी असावा लागतो असे नाही. त्या पक्षाला मिळणे, त्याच्याशी सहकार्य करणे ह्या गोष्टी सोप्या आहेत. . दोन दिडक्यांची गांधी टोपी डोक्याला अडकवली की ज्या पक्षाच्या नालायक माणसास दिवाणपदही प्राप्त होते, त्या पक्षाला मिळणे, त्याचा उदो उदो करणे म्हणजे काही सुळावरची पोळी नाही, ही गोष्ट आमच्या टीकाकारांनी अवश्य लक्षात घ्यावयास हवी.

आता सरकारने जाहीर केलेल्या गावकामगारांच्या कामांचा विचार करू. या बाबतीत एक गोष्ट गावकामगारांनी लक्षात ठेवली पाहिजे, त्यांना वतन हवे असल्यास त्यांनी वतनासाठी काम पत्करलेच पाहिजे. वतन हवे पण काम नको असे म्हणून चालणार नाही, पण सरकारने प्रसिद्ध केलेल्या गावकामगारांच्या यादीत महारांवर लादलेली खालील कामे त्यांनी करावयाची तर त्यांना रोज मजूरी देणे अगत्याचे आहे. सरकारचा वसूल तिजोरीत भरणे, सरकारी दप्तर नेणे व आणणे, सरकारी टपाल नेणे, आणणे, कोंडवाड्यातील गुरे लिलावासाठी नेणे,