न्याय्य हक्काआड सरकार आले तर . . . . . सहन करू नका २८५
अधिकाऱ्यांसाठी तंबू , राहुट्या लावणे ही कामे रोजंदारी दिल्याशिवाय महारास करावयास लावणे हा निव्वळ वेठीचाच एक जुलूमी प्रकार आहे. गावातल्या गावात जी कामे करावयाची ती नेहमीप्रमाणे करावी पण बाहेरगावी जावून करावयाची कामे कोणीही रोजंदारीशिवाय करता कामा नये. अशा बाहेरगावच्या कामासाठी कामगारास रोजी आठ आणे तरी रोजंदारी मिळालीच पाहिजे.
काम नं. १५ बेपत्ता मयताची व्यवस्था लावणे हे आहे. हे काम करण्यास
कोणीही स्वाभिमानी महार तयार होणार नाही.
काम नं. २ हे सरकारी माहिती देण्यासाठी गावकऱ्यांना बोलावणे हे होय. हे काम घरोघर बोलावणे न करता दवंडी पिटवून करून घेण्यात आले पाहिजे. जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे काम महारावर लादणे अन्यायाचे
आहे. ज्याच्या घरी जन्म अगर मृत्यू होईल त्याजवरच त्याची नोंद करण्याची
जबाबदारी ठेवावयास हवी.
अशा रीतीची वतनदार महार, मांग व वेठी यांची बहुविध गाऱ्हाणी आहेत. ही
दूर करून घेण्यासाठी आपण गव्हर्नर साहेबांकडे डेप्युटेशन नेऊन त्यांना ती
समजावून दिली पाहिजेत. याबाबत एक सविस्तर अर्जही आपण सरकारकडे
धाडला पाहिजे. इतक्याने काम भागून आपली गाऱ्हाणी दूर झाली तर
ठीकच, पण आपला जय झाला नाही तर आपण सत्याग्रह पुकार. या
अन्यायाचा प्रतिकार करावयास हवा.
आपली स्थिती आज जुन्या कपड्यासारखी झाली आहे. ठिगळे लावून ही
परिस्थिती सुधारणार नाही. आकाशाला कोण कशी ठिगळे लावणार ? आपण
वतने सोडण्याशिवाय आपला तरणोपाय नाही.
सन १९२६ पासून मी ही गोष्ट सांगत आहे. त्यावेळी वतने, महारकी, डल्ल्या,
सागुती यांचा मोह आपणास सुटत नव्हता. आज आपला दृष्टीपालट झालेला
पाहून मला कृतार्थ वाटत आहे.
वतने सोडा पण हातच्या जमिनी मात्र गमावू नका. शेतसारा भरा व
वतनाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वाभिमानी शेतकरी बना. काम न करता
इतरांना दिलेली वतने कायम ठेवण्यात आलेली आहेत. कुलकर्ण्यांची आज
चंगळ आहे. त्यांना सरकारने पेन्शनरच बनवले आहे. अशा स्थितीत तुमच्या
न्याय्य हक्काआड सरकार आले तर खुशाल बंड करा पण अन्याय कदापि सहन
करू नका.