२-१-१९४० युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत - Page 354

१७१
महार वतन आणि महारवाडा ह्या
गुलामगिरीच्याच द्योतक

ता. ३ जानेवारी १९४० रोजी दुपारी सातारा जिल्ह्यातील मेढे या गावी स्वतंत्र

मजूर पक्षाची दुसरी परिषद भरली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या

सभेचे अध्यक्षस्थान देण्याचे ठरले होते.

सभेपूर्वी मोठ्या थाटाने मिरवणूक काढून अध्यक्षांना सभास्थानी आणण्यात आले. इशस्तवन व स्वागतपर पद्ये झाल्यावर सभेच्या कामास सुरवात झाली. स्वागताध्यक्ष रा. सावंत यांच्या भाषणानंतर श्री. जावळे यांनी डॉ. बाबासाहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली व सुचनेस रा. उबाळे व रा. रोकडे यांनी पाठिंबा दिल्यावर डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. अध्यक्षांची प्रकृती नादुरुस्त असल्याने. त्यांनी नाशिकचे स्वतंत्र मजूर पक्षाचे रा. भाऊराव गायकवाड यांना प्रथम भाषण करावयास सांगितले. ते म्हणाले,

कालच्या अपघातात आपले परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब यांना मुका मार फार आहे. अशा स्थितीत त्यांना इतर पुढाऱ्यांप्रमाणे अपरिहार्य कारणे सांगून परिषदेस हजर राहणे टाळता आले असते. पण आपणा सर्वांची निराशा होऊ नये म्हणून इष्ट मित्रांचे न ऐकता ते आज परिषदेस हजर आहेत. आपणासारख्या गरिबांचे पुढारीपण सुखाचे खास नाही. आपल्या पुढाऱ्याला तळहातावर शीर घेऊन लढावे लागते याची जाणीव आपणास आहेच. गेल्या आठवड्यात एकामागून एक, दोन अपघात झाले असूनही बाबासाहेबांनी आपल्या कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. आपल्या मार्गात कितीही संकटे आली तरी आपण पुढे जाण्याचे सोडून माघार घेता कामा नये असा धडा बाबासाहेबांच्या वर्तनावरून आपण घ्यावयास नको काय?

यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे श्री. अनंतराव चित्रे यांना भाषण करावयास सांगितले. रा. चित्रे यांच्या भाषणानंतर डॉ. आंबेडकर यांनी भाषण केले, ते म्हणाले,

भगिनी, पाहूणे मंडळी, बंधुजनहो,

आजच्या परिस्थितीत मनाजोगे भाषण करणे मला शक्य नाही. आजच्या सभेचा बेरंग होण्याचा समय आला होता पण देवाच्या दयेने तो टळला आहे.

जनता : २० जानेवारी १९४०.