महार वतन आणि महारवाडा ह्या गुलामगिरीच्याच द्योतक ३१७
हा प्रसंग टळला असला तरी मला फार वेळ बोलता येणार नाही. अशा प्रसंगी रा. भाऊराव गायकवाड व श्री. चित्रे हे दोन देवदूतच मला भेटले. त्यांनी आयत्या वेळी धावत येऊन भाषण करण्याची माझी जबाबदारी हलकी केली. या कामगिरीबद्दल मी या देवदूतांचा आभारी आहे. मी आता महार वतन व सातारा येथील अस्पृश्य विद्यार्थ्यांचे वसतिगृह याबाबत दोन शब्द सांगणार आहे. असे करण्यापूर्वी रा. उबाळे यांनी या परिषदेत केलेल्या भाषणाचा मी प्रथमतः विचार करणार आहे. रा. उबाळे यांनी रा. सावंत आजच्या परिषदेचे स्वागताध्यक्ष याजवर थोडीशी आडून टीका केली आहे. श्री. सावंत यांची कामगिरी मला माहीत आहे व ती बहुमोलाची आहे. असे माझे मत आहे. वर्तमानपत्रातून रा. सावंतांचे नाव झळकत नाही म्हणून त्यांची कामगिरी कमी प्रतीची ठरते, असे भर सभेत सांगण्यात आले. या बाबतीत माझे स्वतःचेच उदाहरण मी आपणास देणार आहे. मी गेल्या सव्वादोन वर्षात विधिमंडळात फक्त चारच भाषणे केली आहेत. मी प्रश्नही कधी विचारलेले नाहीत. गैरहजर असणाऱ्या सभासदातही माझा नंबर वर लागणारच. मग उबाळयांच्या दृष्टीने रा. सावंतांपेक्षाही मी जास्तच नालायक ठरणार नाही का ?
कायदे मंडळात १७५ सभासद आहेत. ते निरनिराळ्या पक्षांचे आहेत. सर्व पक्षांचे सर्व सभासद काही तेथे भाषणे करीत नाहीत. तेथे मोजके लोक मोजकी भाषणे करीत असतात. विधिमंडळात काँग्रेसचे ९२ सभासद आहेत. त्यापैकी किती भाषणे करतात याची रा. उबाळयांना माहिती असती तर त्यांनी रा. सावंतांवर टीका केली नसती. श्री. सावंत यांनी गेल्या दोन सव्वा दोन वर्षात, एक कारकून, सहा तलाठी, अकरा पट्टेवाले, एकवीस शाळा मास्तर, सदुसष्ट पोलीस, सहा शिक्षकिणी व एकोणवीस पोस्टमन यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. ही काय “कमी महत्त्वाची कामगिरी आहे. महारांवर स्पृश्यांचा दात आहे. महार तक्रारखोर आहेत असे सांगण्यात येते. अशा स्थितीत १३१ महारास चाकऱ्या लावून देणे ही काही सोपी गोष्ट नाही, तरी अशी रा. उबाळे तक्रार करतात. पण त्यांनी सातारा येथील अस्पृश्य वसतिगृहास मदत करण्याचे जे वचन दिले होते ते पाळले काय असा माझा त्यांना सवाल आहे. मंदिराला कळस चढविण्याची इच्छा असणाऱ्यांनी तरी त्याचा पाया उखडून टाकता कामां नये. विघातक टीका करून निव्वळ उणेपणा काढण्यात काय हशील ? |
आता महार वतनाच्या प्रश्नाकडे आपण वळू या. आपल्या पायातील वतनाची बेडी तोडून टाकल्याशिवाय आपला तरणोपाय नाही. वतन आहे तोपर्यंत आपण गुलामच राहणार. वतन नाहीसे करून आपण स्वातंत्र्य मिळविलेच पाहिजे. गावोगावचे महारवाडे आपण नष्ट करून टाकले पाहिजेत.