१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 367

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने . .. . . . हा भ्रम ३२९

आपली चळवळ अव्याहतपणे फोफावत आहे

हा प्रतिज्ञाविधी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या गजरात भाषण करावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनी आणि बंधुजनहो,

आता आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातील पहिला कार्यक्रम पार पाडीत आहो. दुपारी मिरवणुकीचा दुसरा कार्यक्रम पार पाडून आपली सभा सायंकाळी होणार आहे. मिरवणुकीत व सभेत आपण शिस्त व शांतता राखली पाहिजे. गेल्या पंधरा वर्षांच्या अवधीत आपणास कुलाबा जिल्ह्यात, विषेशतः महाडास स्पृश्यांपैकी अनेक सहकारी लाभून आपली चळवळ अव्याहतपणे फोफावत आहे. तरी पण आपल्या समारंभात कोणीही काहीच उपद्व्याप करणार नाही अशी खात्री देता येत नाही. जुन्याकाळची आपली आठवण अद्याप ताजी आहे. म्हणून आपण मिरवणुकीत व समारंभात शिस्त व शांतता राखण्याची शिकस्त केली पाहिजे. समारंभाचा खेळ खंडोबा करण्यास एखाद दुसराही माणूस पुरेसा होत असतो. एखादा अपशब्द वापरण्यात आला, एखादा दगड फेकण्यात आला तरीही शांतताभंग होण्याचा संभव असतो. असे काही झाले तरी आपण शांतता राखावी असा मी आपणास इशारा देत आहे. समारंभाचा बेरंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी त्याकडे दुर्लक्ष करा व समारंभ यशस्वी करा असे माझे आपणास सांगणे आहे. माझे स्वातंत्र्य दिनाबाबतचे भाषण संध्याकाळच्या सभेत होणार असल्यामुळे आता जास्त काही बोलण्याची

जरूरी नाही.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर स्वयंसेवक मंडळी चवदार तळ्याला फेरी घालून घरी गेली. झेंडावंदन समारंभाप्रसंगी लाऊड स्पीकर लावल्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम चवदार तळ्यापासून एक मैलपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत

होता.“ १ |

'' अस्पृश्य स्वातंत्र्यदिनाची विराट सभा

दुपारी सुमारे तीन वाजता सभाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक जंगी मिरवणूक काढून त्यांना सभास्थानी आणण्यात आले. महाडच्या इतिहासात ही मिरवणूक व सभाही अद्वितीयच होती. या सभेस पुण्याचे श्री. गोपीनाथराव पोतनीस यांजबरोबर सुमारे १,००० मावळे मुद्दाम येथे आले होते.

मिरवणुकीस सुरवात वीरेश्वर रोडवरून होऊन ती पोष्ट ऑफिस, उभा प्रांतिक रस्ता, साळवाडा अलावा, सरेकर आळी, चवदार तळ्याची दक्षिण बाळी, डोंगरे पूल, पेठ व सुकाळी गल्ली या मार्गाने सभास्थानी नेण्यात आली. मिरवणुकीची लांबी सुमारे मैल ते दीड मैल होती. |

१ जनता : २३ मार्च १९४०.