मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका ३६५
म्हणून म्युनिसीपल कमिश्नरला कळविले आणि संपाची नोटीस दिली. आमचा संप फोडण्याचा फार प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी मागण्या म्युनिसीपल कमिश्नरने मान्य केल्या व ड्रेनेज डिपार्टमेंटमधील लोकांचा पगार वाढविण्यात आला. या मुंबईमध्ये इतर लोकांनी जे संप केले त्यात त्यांना यश आले नाही. मग हाच संप कसा यशस्वी झाला ? त्याचे कारण दुसरे तिसरे नसून संघटना हेच होते.
तुम्ही जो हा धंदा करता तो करण्याकरिता स्पृश्य लोकांना दरमहा १०० रुपये दिले तरी कोणीही तो करणार नाही. तुम्ही जर संप केला तर मुंबईत राहाणाऱ्या लोकांना तडफडून मरून जावे लागेल. म्हणून तुम्ही एकी ठेवल्यावर या मुंबईमध्ये राहाणाऱ्या लोकांची नांगी तुमच्या हातात राहील.
हल्ली तुम्हाला महागाई भत्ता मिळावा म्हणून म्युनिसीपालिटीमध्ये ठराव आणिलेला आहे. म्हणून तुम्ही म्युनिसीपल कामगार युनियनचे सभासद होऊन युनियनच्या लढ्याला साहाय्य करा, इतके सांगून मी माझी जागा घेतो.