१८६
मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर
का नसावा ?
तारीख २३ फेब्रुवारी १९४१ रोजी तडवळे (ढोकी) येथे आयोजित सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा भागातील महार-माँग वतनदार परिषदेच्या कामासाठी अखिल भारतीय अस्पृश्यांचे वंदनीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तारीख २२ फेब्रुवारी १९४१ रोजी सकाळी १० वाजता तडवळे स्टेशनवर उतरले. बार्शीपासून पुढील प्रत्येक स्टेशनवर त्यांचा अस्पृश्य समाजाकडून सत्कार झाल्यामुळे गाडी आज अर्धा तास तडवळ्याला उशीरा आली. तेथून लतापल्लवांनी शुंगारलेल्या पन्नास बैलांच्या गाडीतून लतापल्लवांनी शृंगारलेल्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघाली ! शिंगे, हालग्या, नगारे, तुतारे, सनया, ब्यांड वाजंत्री, तडवळे, येडशी, उस्मानाबाद वगैरे ठिकाणच्या आत्मयज्ञ दलाचे शेकडो सैनिक आणि हजारो अस्पृश्यांच्या मुखातून निघणाऱ्या ' आंबेडकर कौन है, दलितोंका राजा हे ' वगैरे जयजयकाराने तडवळ्याचे वातावरण दणाणून गेले. अशा आनंदाने मिरवणूक परिषदेच्या मंडपात येताच शेकडो स्त्रियांनी बाबासाहेबांच्यापुढे पाण्याच्या घागरी ओतून त्यांच्यावरून नारळ ओवाळून टाकून, ' इडापिडा टळो बाबासाहेब सुखी राहोत,' म्हणून पंचारतीने ओवाळले. कित्येक बायांनी ' आमची ही अल्पशी देणगी इमारत फंडाला घ्या ' म्हणून काही पैसेही दिले । शेकडो हार बाबासाहेबांना अर्पण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी निवासस्थानी गेले व सायंकाळी विषयनियामक कमेटी आणि इतर चर्चा झाली.
दुसऱ्या दिवशी तारीख २३ फेब्रुवारी १९४१ रोजी सकाळी ९.४५ वाजता दहा हजार श्रोतृसमुदायाने भरलेल्या मंडपात ईशस्तवनाने परिषदेच्या कार्याला सुरूवात झाली. नंतर ए. एच. भालेराव यांनी अध्यक्षांची सूचना मांडली. तिला हरिभाऊ तोरणे यांनी अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. देवीचंद मारूती कदम यांचे भाषण झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
जनता : १ मार्च आणि ८ मार्च १९४१.