३८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जयघोषामध्ये बोलावयास उभे राहिले. बाबासाहेब म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुंनो !
आजची ही सभा का भरविण्यात आली, हे आपणा सर्वास माहीत आहे. गेल्या
वर्ष दीड वर्षापासून सरकारने आपल्या वतनासंबंधाने अन्यायाचे धोरण अंगिकारले
आहे. महार, मांग, वेठिया या वतनदारांच्या ज्या जमिनी वंशपरंपरा त्यांच्या
ताब्यात आहेत त्या जमिनीवर त्यांची सर्व उपजीविका अवलंबून आहे. त्या वतनी
जमिनीवर सरकार जादा जुडी लादीत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सरकार ही
नवीन लादलेली जुडी वसूल करीत आहे. माझ्या माहितीवरून, १९३९ साली
सरकारला या नवीन धोरणामुळे १,५०० किंवा २,००० रुपये अधिक मिळाले.
सन १९४० साली ही वाढ ५,००० रुपये झाली आहे. या सरकारी अन्यायी
धोरणाविरूद्ध लोकमत जागृत करून गेल्या साली हरेगाव मुक्कामी मुंबई इलाखा
महार, मांग, वेठिया वगैरे अस्पृश्य वतनदारांची परिषद माझ्या अध्यक्षतेखाली
भरली होती. त्या परिषदेने असा ठराव पास केला होता की जादा जुडीच्या
अन्यायी धोरणाबाबत सरकारकडे खलिता सादर करण्यात यावा. तो खलिता
मान्य न झाला तर सरकारी कामावर बहिष्कार घालावा किंवा इतर कोणता तरी
प्रतिकारात्मक मार्ग स्वीकारावा. परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी त्या ठरावाचा
खलिता ना. गव्हर्नरांकडे पाठविला. त्याच्यावर विचार चालू आहे, असे मला
सरकारकडून उत्तर आले, परंतु इतका अवधी लोटला तरी अद्याप सरकारी
धोरणात बदल झालेला नाही. उलट मी तर असे ऐकतो की या जिल्ह्याप्रमाणे
सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी सरकारने महार वतनदारांवर दिवाणी दावे केले
आहेत. जादा जुडीच्या वसुलीसाठी पोलिसांनी मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न
केला. पुरेशा मालमत्तेच्या अभावी जनावरे जप्त करण्याचा व त्याही अभावी घरे
जप्त करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या या धोरणाबाबत लोकांमध्ये असंतोष
उत्पन्न करणारावरही कायदेशीर इलाज योजण्याचा सरकारचा विचार आहे.
सरकारचे हे धोरण अत्यंत अन्यायी असे आहे. त्यास न्यायाचा किंवा नितीचा
मुळीच आधार नाही. या अन्यायी धोरणाच्या प्रतिकारासाठी आपण आता सिद्ध झाले पाहिजे.
वतन पद्धत ही नवीन नसून ती फार जुनी आहे. ही पद्धत हिंदुंच्या राज्यापासून सुरू आहे. इंग्रजांची सत्ता येथे प्रस्थापित झाल्यावर त्यांनी आपल्या सोयीनुसार या वतन हक्कांमध्ये फेरफार केले. महार, मांग, वेठिया वगैरे लोकांप्रमाणेच येथे इतर वतनदार आहेत. परंतु इतरांच्या बाबतीत सरकारने जी न्यास्यबुद्धी दाखविली ती आपल्या बाबतीत दाखविली नाही. या अन्यायाची आपणास कल्पना यावी म्हणून मी आपणास दोन चार उदाहरणे सांगतो.