आपला उद्धार इतर करणार . . . . . . कंबर कसली पाहिजे ३९५
सांगण्याची मला जरुरी नाही. मला माझे पुढारीपण कोणापुढे मिरवावयाचे नाही. परंतु याबाबतीत एक गोष्ट स्पष्ट करणे जरूर आहे. माझ्याविषयी कोणी काहीही म्हणोत मला त्याची पर्वा नाही. परंतु आपण जी क्रांती केली आहे ती एक मोठी क्रांती आहे, हे आपण विसरता कामा नये.
ही पूर्वपीठिका मी आजच्या प्रसंगी का निवेदन केली ? मला तुम्हाला आज आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी जे निवेदन करावयाचे आहे आणि ज्या निवेदनासाठी मी आजच्या प्रसंगी मुद्दाम हजर राहिलो आहे, ते सांगण्यापूर्वी आपल्या चळवळीचे आतापर्यंतचे स्वरूप नीट ध्यानात यावे म्हणून ही पूर्वपीठिका निवेदन केली. आपण आपल्या मुक्कामाच्या-ध्येयाच्या जवळ आलो आहोत, असे मला वाटत होते. एकेकाळी मला वाटत होते की, कालांतराने आपण स्पृश्य समाजात समरस होऊ. कालांतराने अशी स्थिती येईल की स्पृश्यास्पृशातील
भेदभाव नष्ट होईल. नाशिक, महाड येथे जी चळवळ केली तिचा हाच मुख्य
हेतू होता. सार्वजनिक स्थळांचा आणि पाणवठ्यांचा उपभोग आम्हाला पाहिजे
या भावनेने उद्दीप्त होऊन आपण सत्याग्रह केले. पण हिंदू लोक आपणास
समानतेने सामील करून घेण्यास सिद्ध होत नाहीत.
हे आम्हास स्वानुभवाने दिसून आले. म्हणून आम्ही आपली कार्याची दिशा
बदललेली आहे, ही गोष्ट आपण आणि स्पृश्य हिंदुंनीही पूर्ण लक्षात ठेवावी, असे
माझे सांगणे आहे.
जर हिंदू समाजात आम्हास समतेचे आणि ममतेचे रथान नाही, तर आमचे
राजकारण आम्ही आमच्याच हाती घेतले पाहिजे. दोन भावांचे भांडण झाले तर
त्याचे विभक्तिकरण होते. तसे स्पृश्य हिंदुंचे आणि आमचे हक्कांबाबत
विभक्तिकरण झाले पाहिजे. स्पृश्य आणि आपण यांच्यामध्ये कोणत्याही
प्रकारची ऐक्यभावना उरलेली नाही. आपले उभयतांचे अशा प्रकारचे हक्काबाबत
विभक्तिकरण झाल्याखेरीज हे भांडण कदापि मिटणे शक्य नाही, हे सर्वांनी
लक्षात ठेवावे. यात माझे कोणाशी वैयक्तिक वैर नाही. हे भांडण, एक भाऊ
दुसऱ्या भावाच्या जुलूमाला कटाळून विभक्त होऊ इच्छित असताना दुसरा भाऊ
ते मान्य करीत नाही, अशा स्वरूपाचे आहे. परंतु याप्रसंगी मला स्पृश्य हिंदुंना
जाहीरपणे असे निक्षून सांगावयाचे आहे की आधी आमचा वाटा द्या. आमचा
वाटा आम्हाला मिळाल्यास तुमचे स्वातंत्र्य मिळविण्याचे भांडण लढण्याची
जबाबदारी मी घेतो. स्पृश्य हिंदुंप्रमाणेच हा देश त्वरित स्वतंत्र व्हावा, असे