३९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आमचे मत आहे. इतकेच नव्हे तर, इंग्रजांचे राज्य या देशात एक दिवसही राहू
नये, या मताचा मी आहे. परंतु ज्या राज्यसत्तेवर आपल्या अखिल समाजाचे भवितव्य अवलंबून आहे त्या राज्यसत्तेचा हिस्सा देण्याचे हिंदुंनी नाकारले तर तो साध्य करण्यासाठी मी समर्थ आहे.
यापुढे आपल्या समाजाने अत्यंत सावध राहिले पाहिजे. क्रिप्सच्या वाटाघाटी अयशस्वी होऊन ते परत गेले. क्रिप्सची योजना फेटाळली गेली ही आपल्यावर अत्यंत मोठी कूपा झाली आहे. ही योजना पाहून इंग्रजांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला अत्यंत आश्चर्य वाटले. घटना समितीची मागणी काँग्रेसने केली होती. तिला सर्व अल्पसंख्यांकांनी विरोध केला होता. त्याप्रमाणे सरकारनेही घटना समितीची कॉँग्रेसची मागणी अमान्य केली होती.
स्वयंनिर्णायक घटना समितीची योजना मान्य केली तर आपले हक्क ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी स्पृश्यांच्या हाती जाईल. याप्रमाणे या घटना समितीच्या योजनेने आपल्या समाजाच्या भवितव्यावर मोठा घाला आला होता.
सरकारला वाटते की अस्पृश्य लोक गरीब, अल्पसंख्यांक, दरिद्री आहेत. म्हणून आपले हक्क देण्याची त्यांना बुद्धी नाही. तेव्हा याउपर आपण योग्य तो धडा घेतला पाहिजे. आपले न्याय्य हक्क संपादन करण्याकरिता लढण्यास सिद्ध झाले पाहिजे. चारी दरवाजे बंद करून आपला कोंडमारा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही मार्गाचा अवलंब करून आपण आपले अस्तित्व झगडून टिकविले पाहिजे. आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे. तरच काही तरी तरणोपाय आहे.