२६-४-१९४२ आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे - Page 435

१९४
लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच
लाभतील, पण लोकशाही मेली तर विनाश अटळ

नागपूर येथे दिनांक १८ व १९ जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित वर्ग

परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. या परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या चळवळीवर विचारविनिमय होऊन चळवळीची पुढील दिशा

ठरविण्यात येणार असल्यामुळे या परिषदेस असाधारण ऐतिहासिक महत्त्व

होते. प्रथमतः या परिषदेची पार्श्वभूमी आणि कार्यवाही याबाबत माहिती देऊन त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण आणि त्यानंतर दिलेले परिषदेच्या समारोपाचे भाषण दिले आहे. या परिषदेसोबतच ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुइमेन्स कॉन्फरन्स्‌ आणि समता सैनिक दल कॉन्फरन्स

घेण्यात आल्या. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भाषणे क्रमशः दिली आहेत- संपादक |

'' डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली १९४२ मध्ये अखिल भारतीय दलित परिषद भरविण्याचे ठरले. त्यावेळी नागपूरातील सर्व वर्तमानपत्रकारांची एक सभा हितवाद प्रेसच्या गोखले हॉलमध्ये घेण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे एक ब्राह्मण पुढारी होते. ही वर्तमानपत्रकारांची सभा विशिष्ट हेतूकरिता बोलावण्यात आली होती. तो हेतू असा की डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्ष तेखाली होणार असलेल्या परिषदेच्या वृत्तावर नागपूरातील सर्व वर्तमानपत्रांनी बहिष्कार घालावा. अशा प्रकारचा एक प्रस्ताव तयार करून त्यावर उपस्थित पत्रकारांच्या सह्या घेण्याचे कार्य सुरू असतानाच त्या बैठकीला उपस्थित असलेले ' श्यामसुंदर ' चे संपादक राजहंस रामचंद्र पाटील यांनी त्यासंबंधी विचारणा केली. त्यावेळी त्यांना ह्या प्रस्तावासंबंधी माहिती मिळाली. राजहंस पाटील यांनी अशा प्रकारच्या प्रस्तावास आपला जोरदार विरोध दर्शविला. ते म्हणाले, “ व्हाइसरॉयच्या मंत्रीमंडळात असणारे श्री. बापूजी अणे, डॉ. खरे हे तुमच्या दृष्टीने देशभक्त होऊ शकतात आणि डॉ. आंबेडकर हे देशद्रोही काय? खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकर हे खरे देशभक्त आहेत कारण शेकडो वर्षे गुलामगिरीत पिचत पडलेल्या दलित समाजाच्या स्वातंत्र्याकरिता ते लढत आहेत. तुमचे हे कृत्य नादानपणाचे आहे. मला ते मुळीच मान्य नाही.