६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहेत. श्री. भाऊराव गायकवाड यांची ही कामगिरी लक्षात घेऊनच स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी त्यांचे नाव सुचविले आहे. श्री. गायकवाड यांच्याविरुद्ध | श्री. रामचंद्र रोकडे उभे आहेत. ते मंदिर-प्रवेश सत्याग्रहाचेवेळी कोठे दडून | बसले होते ? सार्वजनिक सेवा म्हणून ज्याला म्हणतात ती काही त्यांच्या पाठीशी आहे काय ? (नाही-नाही म्हणून लोक ओरडतात) १९३५ च्या इंडिया अँक्टात स्पष्टपणे म्हटले आहे की, यापुढे मुंबई कायदेमंडळाच्या सभांचे | कामकाज इंग्रजीतून चालेल. जर आपले काही गाऱ्हाणे कायदेमंडळापुढे मांडणे असल्यास ते इंग्रजीतूनच मांडले पाहिजे. असा स्पष्ट निर्बध आहे. असे | असता आपले गार्हाणे इंग्रजीतून मांडण्याइतके इंग्रजी श्री. रोकडे यांना येते काय ? (नाही-नाही म्हणून लोक ओरडतात.) रोकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या विनंतीपत्रात ते म्हणतात की मी कोणत्याही पक्षातर्फे अगर संस्थेतर्फे उभा नाही. जर रोकडे कोणत्याही पक्षातर्फे अगर संस्थेतर्फ उभे नसतील तर मग त्यांच्या कार्यात त्यांना कोण मदत करणार ? ना पशू ना पक्षी म्हणणाऱ्या वटवाघुळासारखी स्थिती अशा इसमाची झाल्याशिवाय राहील काय ? त्यापेक्षा. सरळ काँग्रेस अगर अशाच इतर संस्थेतर्फे रोकडे उभे राहिले असते तर एकवेळ परवडले असते. परंतु, 'ना ही धड ना ती धड' ही स्थिती बरी नाही.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता उभे राहिलेल्या उमेदवारात कायदेमंडळासाठी लायक कोण नी नालायक कोण हे शोधून काढणे अत्यंत सोपे काम झाले आहे. कारण श्री. भाऊराव गायकवाड व श्री. रामचंद्र रोकडे यांची सार्वजनिक कार्याच्या दृष्टीने, हुशारीच्या दृष्टीने, कर्तबगारीच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने सर्वतर्हेने तुलना करता :
"कहां राजा नि कहां पोतराजा"
"कोठे पर्वत तर कोठे खडा"
"कोठे सोने तर कोठे कथील"
"कोठे घोडा तर कोठे गाढव"
इतके अंतर उभय उमेदवारात आहे, ही गोष्ट सुर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. असे असता तुम्हाला बुचकळ्यात पडण्यासारखे काय आहे? तरी सर्वानी आपली चारही मते श्री. भाऊराव गायकवाड यांनाच द्यावीत. अशी मी विनंती करतो.