लोकशाही जिवंत ...... तर विनाश अटळ ४१५
नेहमीच्याच पण अतर्क्य कारणामुळे आपल्यामध्ये कोणी लायक उमेदवारच सापडणार नाही ! आपणा सर्वांना माहीतच आहे की, नेमणूक. करणारा अधिकारी जर एखादा हिंदू असेल तर अस्पृश्यांमध्ये कोणीही योग्य उमेदवार नसतोच ! चवथी गोष्ट म्हणजे, केंद्रीय आणि प्रांतिक शासनामध्ये अस्पृश्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी तुम्ही आग्रह धरला पाहिजे. हे मूलभूत उपाय आहेत. ज्या लोकांच्या हाती ही मूलभूत शक्ती आहे, ते परिस्थितीला हवी तशी वाकवू शकतात. अत्यंत भयावह अशा सामाजिक चेष्टांनाही ते आळा घालू शकतात व केवळ तेच सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबतीत हितकर असे बदल घडवून आणू शकतात. या गुरुकिल्लीच्या जागी आपले प्रतिनिधी ठेवण्यात आलेच पाहिजेत असा अस्पृश्यांनी आग्रह धरावा. यावेळी ही गोष्ट आश्वासनांवर किंवा रूढीवर मुळीच सोपविल्या जाऊ नये. परिस्थितीनुरूप हिंदुंनी दिलेल्या | वचनावर मुळीच विश्वास ठेवू नये. या संबंधी घटनेमध्ये तरतूद केली जावी,
यावर दक्षतेने तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
अस्पृश्यांनी जिच्यासाठी आग्रह धरावा अशी एक शेवटची मागणी आहे. ती शेवटची असली तरी कोणत्याही दृष्टीने तिचे महत्त्व कमी नाही. खरेच, माझी तर अशी खात्री आहे की, ती अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. इतकेच नव्हे तर इतर सर्वापेक्षाही ती अधिक महत्त्वाची आहे. हिंदुंच्या खेड्यांव्यतिरिक्त अस्पृश्यांच्या स्वतंत्र व विभक्त अशा नवीन वसाहती स्थापन करण्याच्या योजनेसंबंधी मी बोलत आहे. इतक्या हजारो वर्षांपासून अस्पृश्य लोक हिंदुचे दास व गुलाम होऊन का राहिलेले आहेत ? माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर हिंदू खेड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमध्ये आहे. सर्व भारतात जवळ जवळ सात लक्ष खेडी पसरली आहेत. हिंदुंच्या या प्रत्येक खेड्याला अस्पृश्यांची एकेक लहानशी वसाहत जोडलेली आहे. त्या खेड्यातील हिंदुंच्या लोकसंख्येच्या मानाने
अस्पृश्यांची संख्या फारच लहान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या अस्पृश्यांच्या वसाहतीजवळ आर्थिक साधने नाहीत आणि प्रगतीची त्यांना संधीही नाही. ही कायमची भूमिहीनं लोकांची वसाहत असते. अस्पृश्य असल्यामुळे ते कोणतीही वस्तू विकू शकत नाहीत. कारण अस्पृश्यांपासून कोणीही काहीही विकत घेत नाही. ही वसाहत पूर्णतः कंगालांची, पोटासाठी हिंदू लोकांवर अवलंबून असलेली वसाहत असते. ती भिक्षेवर किंवा क्षुल्लक मजुरीवर काम करून कसाबसा उदरनिर्वाह करीत असते. अशा परिस्थितीत अस्पृश्य शेकडो वर्षे केवळ अवमानित अवस्थेत का राहिले असतील याची कल्पना सहज करता येण्यासारखी आहे. कारण हिंदुंच्या विरोधी काही प्रतिकार करणे अस्पृश्यांना