१६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत - Page 46

ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लोकांचीच जरुरी आहे, असे नाही. मराठा समाजाच्या उमेदवारांकडे व मागे

कौन्सिलर असलेल्यांकडे पाहिल्यास ही गोष्ट दिसून येईल. यावर माझे असे

म्हणणे आहे की मराठ्यांचा एकही वाटोळ्या पगडीचा व अडाणी इसम

कायदेमंडळात गेला तरी चालेल. परंतु तुमचा मनुष्य मात्र तसाच पाठवून

भागणार नाही. तर तो त्यापेक्षा १५ पट हुशार व कर्तबगार असावयास हवा

आहे.

आपल्या या नाशिक जिल्ह्यात गायकवाड व रणखांबे हे दोघेही कार्यकर्ते असताना भाऊराव गायकवाडांचीच निवड मी का केली याबाबत बराच संशय माजला असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील दोन इसम गायकवाड व रणखांबे कायदेमंडळात जाण्यासाठी लायक आहेत, ही गोष्ट खरी म्हणूनच चार महिन्यांपूर्वी उभयताना बोलावून मी स्पष्टपणे सांगितले होते की, तुमच्या जिल्ह्यातर्फे कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी कोणी उभे राहावे हे तुम्ही उभयता आपसात ठरवून मला तसे कळवा. तसेच तुम्हा उभयतात जर हा वाद मिटला नाही व निकाल देण्याची पाळी जर मजवर आली तर मात्र मी भाऊराव गायकवाड यांच्यातर्फे निकाल देईन, असे रणखांबे यांनाही सांगितले होते. कारण उभयतात अधिक लायक कोण हे तुम्हापेक्षा मी चांगले जाणतो. आतापर्यंत अमृतराव रणखांबे यांनी अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून अनेक सभात जी भाषणे केली ती अमृतरावांची नसून भाऊराव गायकवाडांनी लिहून दिली आहेत. हे मी जाणतो. रणखांब्यांचा 'बोलविता धनी वेगळाची' असल्याची मूळकथा मला पूर्णपणे माहीत आहे व म्हणून अमृतराव रणखांब्यापेक्षा भाऊराव गायकवाड मला अधिक लायक वाटले.

दुसरे असे की, रणखांबे यांनी राजीखुषीने, अंमलपाणी न करता स्वत:च्या सहीने पत्र पाठवून मला स्पष्टपणे कळविले आहे की, कायदेमंडळात नाशिक जिल्ह्याच्या राखीव जागेसाठी श्री. भाऊराव गायकवाड यांनाच द्या. असे असता आज श्री. रणखांबे यांनी श्री. गायकवाड यांच्या उमेदवारीस मदत करावयास हवी आहे. परंतु प्रत्यक्ष मदत न करता अगर लटस्थही न राहता रणखांबे उघड-उघड भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस विरोध करीत आहेत यास काय म्हणावे ? तसे पाहता रणखांबे घराण्याचा व रोकडे घराण्याचा माझ्या माहितीप्रमाणे गेली सात-आठ वर्ष काही कारणांमुळे वाद होता. उभयतात सलाखा अगर प्रेमभाव तर मुळीच नव्हता. असे असता रणखांबे यांचे नाव मी