या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत ९
कायदेमंडळासाठी सुचविले नाही म्हणून गेली कैक वर्ष भावा-भावाप्रमाणे व गुण्यागोविंदाने राहिलेल्या गायकवाडांविरुद्ध रणखांब्यांनी जाऊन विरोधी गटाच्या गळ्यात मिठ्या माराव्यात व ज्याला आतापर्यत मित्र म्हणून घेतले त्याला विरोध करावा हे रणखांब्यांचे करणे न्यायाचे नाही, अयोग्य आहे. नाशिक जिल्ह्यात असलेली संघटना दुभंगून जो निरर्थक बेबनाव व बखेडा माजविला आहे त्यास श्री, रणखांबेच जबाबदार आहेत.
माझे भाषण संपण्यापूर्वी मला तुम्हा सर्वाना एक आग्रहाची विनंती करावयाची आहे की तारीख १७ फेब्रुवारी १९३७, बुधवार रोजी मतदार बंधू-भगिनीनी आपल्या स्वतःच्या खर्चाने अगर पायी आपल्या पोलीस स्टेशनवर जाऊन आपली चारही मते, स्वतंत्र मजूर पक्षातर्फे, मी उभे केलेले उमेदवार भाऊराव गायकवाड यांनाच द्यावीत. त्यांची निशाणी घोडा असून घोड्याच्या चित्राच्या उजव्या बाजूस चार फुल्या कराव्यात.
डां. बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिक जिल्ह्यातील दौरा कल्पनेच्याबाहेर यशस्वी झाला. दोन दिवसांचा मुक्काम नाशिक जिल्ह्यात चांगलाच गाजला. डॉ. बाबासाहेबांना नाशिक येथे श्री. भाऊराव गायकवाड यांनी काही प्रमुख स्पृश्यास्पुश्य पुढारी मंडळीसह चहापार्टी दिली, श्री. भाऊराव गायकवाड हे नाशिक जिल्ह्यात प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडी चित करून प्रचंड मतांनी निवडून येणार हे खास ! शेवटी डॉ. आंबेडकर साहेबांनी सर्व नाशिककर बंधू- भगिनींना संदेशाद्वारे सांगितले की, "आजपर्यंत नाशिककर बांधवांनी दाखविलेला स्वाभिमान, वीरवृत्ती आणि आपल्या ध्येयाविषयी निष्ठा यापुढे येणाऱ्या प्रत्येक कार्यात अधिक कसास लावून आपल्या पक्षास यशस्वी करा. नाशिक जिल्ह्याने श्री. भाऊराव गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून देणे हेच त्यांचे पवित्र व पहिले कर्तव्यकर्म आहे याची मी तुम्हास जाणीव करून देत आहे आणि मी तुमच्यावर आज लोटून जात असलेली कामगिरी आपण निर्भयपणे पार पाडाल अशी मला बळकट आशा वाटत आहे."
शेवटी पहाटेच्या मेलगाडीने डॉ. बाबासाहेब मुंबईस परत गेले.
+ + +