४२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
माझ्यासंबंधी ज्यांची मते चांगली नाहीत असे बरेचसे लोक आहेत. वाचनात
वेळ घालवून एकाकी जीवन जगणे हा माझा स्वभाव आहे. अशा माझ्या
स्वभावाबद्दल पुष्कळांना असे वाटते की, मी लोकांशी नीट न वागता त्यांना टाळतो
याचा हा पुरावाच आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की कोणाचाही
कसलाही अपमान करावा अशी माझी मुळीच इच्छा नसते. माझे आयुष्य फार
मर्यादित आहे. मला पुष्कळ गोष्टी करावयाच्या आहेत व मदतनीस तर नाही.
पुष्कळ हिंदू माझ्याकडे शत्रुत्वाच्या नजरेतून पाहतात. मी त्यांच्या भावना
दुखविण्याइतके कठोर बोलतो अशी त्यांची तक्रार आहे. परंतु माझे हृदय अत्यंत
कोमल आहे हे मला माहीत आहे. ब्राह्मणांमधून सुद्धा मला पुष्कळ मित्र
आहेत. तथापि, कोमल हृदयाच्या माणसाने सुद्धा सत्य बोलून दाखविलेच
पाहिजे. आपल्या अत्यंत प्रिय अशा आप्तेष्टांना कुत्र्यापेक्षाही वाईट वागविल्या
जात असताना आणि त्यांची पुढील प्रगतीची द्वारे सर्व तऱ्हेने बंद झालेली आहेत
हे दिसत असताना मी हिंदुंशी दयाळूपणाने वागावे अशी ते अपेक्षा तरी कशी करू शकतात ? सध्याच्या हिंदू पिढीने यासंबंधी काही केलेले नाही हे मला कळते. म्हणूनच माझ्या भावना आवरून माझ्या विरोधकांशीही सन्मानपूर्वक वागण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या विरोधकांशी माझी वागणूक दुष्टपणाची कधीच नसते. परंतु त्यांचे अपराधी मन खात असते.
या देशात राजकीय हक्क हिंदू, मुसलमान व दलित वर्ग यांच्यामध्ये विभागल्या जावेत असे माझे निश्चित मत आहे. हिंदू आणि मुसलमानासमवेत दलित वर्गालाही शासनामध्ये योग्य तो वाटा कायद्याने मिळाला पाहिजे. या तीन खांबाचा आधार असला तरच भविष्यकालीन घटना योग्यपणे कार्य करू शकेल. हे प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही सर्वानी एका निशानाखाली संघटित झाले पाहिजे व केवळ एकच संघटना केली पाहिजे. आतापर्यंत आपल्या वाट्याला येणारे अधिकार घटनेमध्ये आपणाला प्राप्त झालें नाहीत, यास एकमेव कारण म्हणजे आपण अजून संघटित झालेलो नाही हेच होय. तुम्ही सर्व संघटित झालात व एका संस्थेखाली कार्य करू लागलात तर तुमच्या अधिकारपात्र अशा स्थितीला तुम्ही पोहचाल, याबद्दल मला मुळीच संदेह नाही.
काँग्रेस ही एक फार मोठी संघटना आहे. तिचा प्रभाव फार दूरवर पसरला आहे. कोणीही सहजच विचारतो की आपल्या संघटनेचा प्रचार असा दूरवर का पसरला नाही. काँग्रेसच्या हाताशी दोन गोष्टींची सुविधा आहे. काँग्रेसच्या पाठीशी भारतातील सर्व छापखाने उभे आहेत. त्यामुळे तिला पूर्णत: प्रसिद्धी मिळते. आपणाला तथाकथित राष्ट्रीय हिंदू वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळत नाही. दुसरी गोष्ट काँग्रेसच्या हाताशी पैसा आहे. तुम्हाला आठवत असेल