२०-७-१९४२ ब्राह्मणशाहीला प्राणघातक ठोसा - Page 463

ब्राह्मणशाहीला प्राणघातक ठोसा ४२५

की काँग्रेसने एक कोटी रुपयांचा फंड जमविला आहे. तिच्या यशाचे रहस्य या अवाढव्य फंडात आहे. परंतु आपल्या जातीच्या कार्यासाठी मी कधीच फंड मागितलेला नाही. जी काही संघटना व प्रगती आपण केली आहे ती कोणत्याही फंडाच्या मदतीशिवाय केलेली आहे. परंतु आपले संघटन करण्याच्या दृष्टीने फंड गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे हे मी तुम्हास सांगितलेच पाहिजे. फंडाशिवाय आपला समाज पुढे वाटचाल करण्यास असमर्थ ठरेल व आधीच सुसंघटित झालेल्या जातीच्या बरोबरीने चालणे आपणास कठीण जाईल.

सार्वजनिक जीवनात चुका घडतातच पण त्यामुळे आपली हिम्मत खचू देऊ नये. चुकांच्या द्वारेच आपणास आपले दोष दिसून येतात व मगच आपण ते घालवू शकतो

अखिल भारतासाठी एक संघटना असावी असा जो ठराव तुम्ही पास केला आहे तो पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा आता तुम्ही स्थापन कराव्या. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व संघटना या अखिल भारतीय संस्थेमध्ये विलीन होतील इकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

कार्यालय व चळवळीचे केन्द्र म्हणून प्रत्येक प्रांतातच नव्हे तर प्रत्येक शहरी आपल्या संघटनेच्या इमारती असाव्यात अशी माझी मोठी अपेक्षा आहे. काल रात्री वेळ्याच्या दशरथ पाटलांशी मी बोलत होतो. नागपूरमध्ये एखादा जमीनीचा तुकडा विकत घेऊन आपल्या संस्थांसाठी एक इमारत बांधण्यास मी त्यांना सांगितले. वीस ते पंचवीस हजाराच्या रकमेत तुम्ही हे करू शकाल. अशा तर्‍हेची इमारत तुम्ही नागपूरला बांधण्याची सिद्धता करू शकलात व इमारतीची कोनशिला बसविण्यासाठी मला निमंत्रण दिलेत तर हे निमंत्रण स्वीकारण्यात मला फार मोठा संतोष वाटेल.