४३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
विचार करण्यासारखे आहे. देव म्हणाला, " तू इतका लीन व लुसलुशीत
दिसतोस की तुला खाऊन टाकावे असा मलासुद्धा मोह होत आहे.” या
गोष्टीतील कोकराप्रमाणेच आपली बरीचशी स्थिती आजपर्यंत होती आणि
म्हणूनच प्रत्येकजण आपणाला खाऊ की गिळू असा धाक घालीत
होता. स्वतःच स्वतःवर लादलेल्या दुर्बलतेच्या रूपातील लीनता हा काही सद्गुण नव्हे, याबद्दल माझी पक्की खात्री आहे. मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा आहेच पण--
' दया तिचे नाव भूतांचे पाळण ।
आणिक निर्दाळण कंटकांचे ॥'
या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने. तुकारामाने अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले आहे. एक सर्व प्राणीमात्रासंबंधी प्रेम व दया आणि दोन दुष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुसऱ्या भागाकडे बहुधा दुर्लक्ष होते व या नजरचुकीमुळेच अहिंसेचे. तत्त्व हास्यास्पद होते. दुष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्त्वातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टरफल, फक्त कल्पनारम्य सुख. व्यवहारात वापरण्याजोगे तत्त्व म्हणून ते उरतच नाही. जोपर्यंत दुसऱ्याला दुःख देण्याची दुष्ट इच्छा आपण बाळगीत नाही आणि जोपर्यंत केवळ सर्व दुष्टांचा नाश करण्याच्या सीमेपर्यंतच आपण मर्यादा घालून घेऊ तोपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध व शक्ती संघटनेविरूद्ध कोणीही कोल्हेकुई करू शकत नाही. शीलाने नियंत्रित केलेली शक्ती आमचा आदर्श आहे. कसल्याही टीकेला भीक घालण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा. ज्याला ज्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्याला त्याला सर्व प्रकारची मदत करा. म्हणजे तुम्ही आमच्या लोकांची फार मोठी सेवा केली असे होईल. आजपर्यंत तुमचे कार्य मुख्यत: आपल्या राजकीय जीवनाला आधार देण्याशीच संबंधित होते. याशिवाय तुमच्या कार्यक्रमाच्या विस्तारासाठी आणखीही अनेक क्षेत्रे आहेत. कोणीतरी बदमाशाने स्त्रीला पळवून नेल्याचे नेहमी शहरात ऐकिवात येते. हिंदू जातीकडून खेड्यात आपल्या लोकांवर अत्याचार झाल्याचे नेहमी ऐकिवात येते. तुम्ही तुमची शक्ती वापरावी अशी ही प्रकरणे आहेत. केवळ तुमच्या संघटनेसारख्या संघटनाच काही सहाय्य करू शकतील असे हे प्रसंग होत.
अखिल भारतीय दलित वर्ग स्वयंसेवक दलाचे अधिवेशन भरविण्याचा तुम्ही निर्णय पास केल्यामुळे मला आनंद झाला. ही फारच आनंदाची कल्पना आहे. ती जर सफल झाली तर परिणामी ती अत्यंत हितावह ठरणार आहे. मी सर्वप्रकारे सुयश चितितो.
मला येथ चार शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली याबद्दल तुमचे व तुमच्या अध्यक्षांचे आभार मानतो. |
७ ७ ७