१९९
मी तीन गोष्टी होऊ देणार नाही
डॉ. बी. आर. आंबेडकर हे व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर * काल अधिकारारूढ झाले व त्यानंतर आज दिनांक २१ जुलै १९४२ रोजी नॅशनल सीमेन्स युनियन मुंबई तर्फे ताजमहाल हॉटेलमध्ये झालेल्या सत्कार समारंभाच्या वेळी मजूर खात्याचे मंत्री या नात्याने मुंबईतील पहिले जाहीर भाषण त्यांनी केले.
आपण स्वतः मजूर वर्गातले असून मजुरांच्या भावना आणि आकांक्षा याच.
आपल्या आकांक्षा आणि भावना आहेत असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले,
आपली ज्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झाली आहे, ते कार्यकारी मंडळ ` मुख्यतः युद्धप्रयत्नासाठी आहे आणि लोकमतानुवर्ती पक्षांचे नसून संमिश्र स्वरूपाचे असल्यामुळे तेथील बहुमतावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहातील.
तथापि, काही झाले तरी मी तीन गोष्टी निश्चितपणे होऊ देणार नाही. कामगारांचे रहाणीचे प्रमाण आहे त्यापेक्षा कमी होऊ देणार नाही आणि व्यवस्थित व सुसंस्कृतरितीने पहाता येईल इतके ते प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय युद्ध प्रयत्नात इतरांच्या प्रमाणापेक्षा अधिक स्वार्थत्यागाचा बोजा मी कामगारांवर पडू देणार नाही. तिसरी गोष्ट अशी की, संकटाच्या परिस्थितीच्या नावाखाली तात्पुरती काही नियंत्रणे कामगारांना सहन करावी लागली तरी कामगारांच्या स्वातंत्र्याला बाध आणणाऱ्या अशा नियंत्रणाला मी कायद्याच्या बुकात समावेश होऊ देणार नाही. त्यांनी पुढे मालक व मजूर यांच्या झगड्यात आपली सहानुभूती नेहमी मजूरांकडेच राहील असेही
आश्वासन दिले.
NS SSIS EES SE
दैनिक नवाकाळ, मुंबई : २३ जुले १९४२.
* दि. २० जुलै १९४२ ला व्हाइसरॉयचा दूत निरोप घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना
भेटावयास नागपूरला आला आणि त्याच दिवशी त्यांनी श्रम मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्याचे
तारेद्वारे कळविले-संदर्भ-डॉ. अंबेडकर लाईफ अँड मिशन, लेखक धनंजय कीर, आवृत्ती ३री,
पृ. २५२.