९८
ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही
अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेदवारांना
निवडून देऊ नका
अखिल भारतीय अस्पृश्यांचे एकमेव वंदनीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेहून परत आल्याबरोबर स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱयाचा कार्यक्रम आखला गेला व तारीख २४ जानेवारी १९३७ हा सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाला. ही बातमी समजताच सोलापूरचे वयोवृद्ध सरपंच श्री. विशवनाथबुवा बंदसोडे, धाकट्या महारवाड्याचे कारभारी संभाजीराव तळभंडारे तसेच केशवराव सोवे, शंकरराव सातपुते, श्रीपतराव पक्षाळे, विठ्ठलराव साबळे, मारुतीराव बंदसोडे, मारुतीराव गायकवाड, जनतेचे एजंट रा. बल्लाळ, रामकृष्ण पुजारी वगैरे भागातील पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या आगमनाची बातमी जिल्ह्यात तातडीने पोचविली. त्याबरोबर ताबडतोब करसाळे, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मंढूप, घळसंग वगैरे भागातील पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या दौऱ्यातील कार्यक्रम-सभेला येणाऱ्या मंडळींच्या जेवणासह पार पाडण्याची तयारी केली व अस्पृश्यांचा उद्धारक, अखिल भारतीय दलितांचा राजा बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध जनता जिल्ह्यात सर्वत्र त्यांची मार्गप्रतिक्षा करीत राहिली. २३ जानेवारीची रात्र सोलापूर येथे जमलेल्या अस्पृश्य समाजाने बाबासाहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी जागून काढली. कॅप्टन यादवराव लोढे व शहरातील निरनिराळ्या तालमीतील भीमसेनेचे स्वयंसेवक यांनी पहाटे ३ वाजताच सोलापूर स्टेशनवर आपला तळ दिला. ४ वाजल्यापासून लोकांची सारखी रीघ स्टेशनकडे सुरू झाली. ६ वाजण्याच्या आत ५-६ हजार लोकांच्या समुदायाने स्टेशनचे पटांगण आणि बाहेरची जागा चिक्कार भरून गेली. ७ नंतर बाबसाहेबांच्या गाडीने स्टेशनात प्रवेश करताच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय' 'आंबेडकर झिंदाबाद' वगैरे-वगैरे जयजयकाराने वातावरण दणाणून गेले. त्या जयजयकारात मातंग समाजातर्फे केरू रामचंद्र जाधव व आपाराव दणाणे, सत्यप्रसारक भीमसेनचे कॅप्टन यादवराव लोंढे, थोरला महारवाडा पंचाच्या तालमीतर्फे नारायण बाबरे, धाकटा महारवाडा आंबेडकर तालमीतर्फं संभाजी तळभंडारे, फॉरेस्ट दीनबंधू आंबेडकर तालमीतर्फे हरिबा खलीफा, श्री. तात्याबा पांडुरंग सावंत, चेअरमन, माळशिरस ग्रामपंचायत, निवृत्तीराव माने व अकुबा लोंढे आणि शहरातील सर्व मोहल्ल्यांतर्फ बाबासाहेबांना हार घालण्यात आले. पुष्पवृष्टी करीत-करीत आनंदोत्साहाने जयजयकार जनता : ६ व १३ फेग्रुवारी १९३७ 3330