४३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अमेरिका या देशात संसदीय लोकशाही अयशस्वी ठरली नाही पण इटली, जर्मनी,
रशियामध्ये ठरली, हे का ? याचे कारण हेच, की त्या ठिकाणी आर्थिक व
सामाजिक लोकशाही जास्त होती. खरे पाहिले असता लोकशाही म्हणजे
समता. संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याचा घोष केला, पण खऱ्या समतेची
तोंडओळख सुद्धा करून घेतली नाही ! समतेचे महत्त्व न कळल्यामुळे स्वातंत्र्य
व समता यांचा तिला मेळ घालता आला नाही. परिणामी स्वातंत्र्यापुढे समता
नामशेष झाली व विषमता वाढली.
पण विचारसरणीतील दोषापेक्षा संघटनेतील दोष हे अपयशाला जास्त
कारणीभूत झाले आहेत. सर्व राजकीय समाजाचे राज्यकर्ते व सामान्य जनता
असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे. एवढ्यावरच हे थांबते तर हरकत नव्हती, पण
त्याच्यावर ताण म्हणजे हे दोन तट इतके कायम राहातात, की समाजाच्या एका
विशिष्ट घटकातूनच राज्यकर्ते निवडले जातात, सर्वसाधारण जनता तशीच
राहते. जनता स्वतः राज्य करीत नाही, ती फक्त शासनसंस्था स्थापन करते
आणि त्यापुढे त्यापासून अलिप्त राहाते आणि ते राज्य आपले राज्य आहे हे
विसरते. असे झाल्यामुळे पार्लमेंटरी लोकशाही जनतेचे राज्य कधीच स्थापू
शकली नाही. थोडक्यात म्हणजे जनतेच्या राज्याचे बाह्य अवडंबर असूनही
वस्तुतः ते एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर परंपरागत चालणारे राज्य झाले आहे. या दोषांमुळेच पार्लमेंटरी लोकशाही अयशस्वी ठरली आणि जनतेची सौख्याची आशा पूर्ण करू शकली नाही.
मग प्रश्न असा उभा राहातो, की याला जबाबदार कोण ? गरीबगुरीब, कामगार व इतर दलित जनता यांचे पार्लमेंटरी लोकशाहीने हित केले नाही हे खरे. पण त्याला तेच मुख्यतः जबाबदार आहेत. आपण असे बघा, की मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे हे तेच विसरले नाहीत का ? मी नुकतेच ' आर्थिक. मानवाचा मृत्यू ' या नावाचे पुस्तक बघितले. पण आर्थिक मानवाचा अजून जन्मच झाला नाही, तर त्याच्या मृत्यूचा प्रश्नच येत नाही. नुसत्या अन्नावरच मनुष्य जगत नसतो हा मार्क्सच्या टीकाकारांनी त्याला दिलेला टोमणा दुर्दैवाने खरा आहे. या मानवाने नुसते डुकरासारखे लट्ठ होणे हे संस्कृतीचे ध्येय नाही हे कार्लाइलचे म्हणणे मला पटते. पण कामगार लट्ठ होण्याचे तर दूरच राहो, त्यांना पोटभर देखील अन्न मिळत नाही. मी तर असे म्हणेन, की सर्व सोडून अन्नाचाच विचार कामगारांनी प्रथम केला पाहिजे.
मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे आणि म्हणून आर्थिक परिस्थितीप्रमाणे इतिहास घडत असतो ही विचारसरणी मार्क्सने जगाच्या पुढे ठेवल्यापासून त्यावर वाद झाले आहेत. पण माझ्या मते त्याने हे तत्त्व म्हणून ही विचारसरणी मांडली