३०-१-१९४४ राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्या- शिवाय स्वराज्याला काय अर्थ - Page 485

२०४ |
राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्याशिवाय
स्वराज्याला काय अर्थ ?

अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे दुसरे अधिवेशन कानपूर येथे तारीख ३० जानेवारी १९४४ रोजी रा. ब. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

' भगिनींनो व बंधुंनो,

आजची ही आपली परिषद प्रातिनिधीक स्वरूपाची आहे. हिंदुस्थानातील बहुतेक प्रांतातून प्रतिनिधी आलेले आहेत. बंगाल व आसामचे प्रतिनिधी जपानबरोबर चाललेल्या युद्धात आणीबाणीचे व महत्त्वाचे कार्य करीत असल्यामुळे परिषदेस येऊ शकले नाहीत. परिषदेस एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला फार समाधान वाटते. पण ह्या समुदायामध्ये स्त्रिया कमी आहेत. आमच्या महाराष्ट्रात व सी. पी. मध्ये कोणत्याही सभेला हजारांनी स्त्रिया हजर राहातात. आमच्याकडे स्त्रिया गोषा किंवा पडदा ठेवीत नाहीत. पती व पत्नी दोघेही सारख्याच प्रमाणात सामाजिक कार्यात भाग घेतात. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा भाग घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्या समाजाचा उद्धार होणार

नाही.

आज जी आपण चळवळ सुरू केलेली आहे ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे,

परंतु त्याचबरोबर आपल्या चळवळीचे मूलतत्त्व काय आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे. अस्पृश्यांची स्थिती आपण सगळे जाणता. २,००० वर्षापासून आपली विच्छिन्न परिस्थिती होण्याचे कारण काय ? आपली अवनती केव्हापासून आहे व ती कधी मिटेल ? आपल्या हलाखीच्या स्थितीचे मोठे कारण हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मात शिवाशिवीला धर्म मानतात व त्यालाच हिंदू धर्माचा मूळपाया ` समजला जातो. हिंदू धर्मात अस्पृश्यांना शिक्षणाची मनाई आहे. शिक्षण घेणे मोठे मुश्कीलीचे आहे. प्रत्येकाला या देशाचा शिपाई बनले पाहिजे. स्वच्छ कपडे अंगावर घालता आले पाहिजे व सर्व धार्मिक विषमता नष्ट झाली पाहिजे.

जनता : ३० डिसेंबर १९४४.