३०-१-१९४४ राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्या- शिवाय स्वराज्याला काय अर्थ - Page 486

४४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तशी स्थिती अस्पृश्यांची झालेली नाही. अस्पृश्यांनी स्वच्छ कपडे

वापरणे हिंदू धर्मात वाईट मानले जाते. पायात चप्पल घालून अस्पृश्यांना

गावातून जाता येत नाही. गेल्यास अस्पृश्यांवर जुलूम केल्याची अनेक उदाहरणे

माझ्याजवळ आहेत. शिवाशिव हे आपल्या अवनतीचे कारण आहे. ज्या धर्मात

अवनती आहे त्या धर्माला फक्त मूर्ख लोक मानतात. अस्पृश्यांनी कानांनी वेद

ऐकले तर त्यांच्या कानात लोखंडाचा रस ओतावा व वाचेने उच्चार केला तर त्यांची

जीभ कापावी, असे हिंदू धर्म-ग्रंथात लिहिले आहे. शम्बूक अस्पृश्य होता. म्हणून

रामाने त्याला ठार मारले. त्याच रामाला हिंदू धर्म देव मानतो ! आणि आश्‍चर्य

हे की ज्या धर्माने आपली एवढी अवहेलना केली, ज्या धर्माने आपल्याला

माणुसकीपासून कायमचे उठवले त्याच धर्माला आमच्यातील काही लोक चिकटून

आहेत. आपण घरादाराला पारखे होऊन गंगा-स्नान करीत बसलो

आहोत. आपली दुर्दशा जर नष्ट करावयाची असेल तर आपण हिंदू धर्माचा

त्याग केला पाहिजे. हिंदू धर्म सोडल्याशिवाय आपले दुःख कधीही नष्ट

होणार नाही.

या व्यावहारिक आयुष्यात आपल्याला कसे जीवन जगता येईल, याचा आपण

विचार केला पाहिजे. भावी स्वराज्यात शासनकर्ती जमात बनणे हे आमचे ध्येय

आहे, की जे स्वराज्य सर्वांचे व आमचेही होईल. सर्वांना शिक्षण व नोकऱ्या

मिळतील. आज कामगाराला सुख नाही, अंगावर कपडे नाहीत, अर्धपोटी जगावे

लागते व राहावयास चांगली घरे नाहीत. ही आजच्या कामगारांची परिस्थिती नष्ट झाली पाहिजे. राजकीय सत्ता आमच्या हातात आली तर प्रत्येक कामगाराला आम्ही कमीतकमी ३० रुपये पगार करू. आपल्या राज्यात चांगली घरे मिळतील व कामगाराला पेन्शन मिळेल. आमच्या राज्यात आजारीपणाचा भत्ता मिळेल व कोणी बेकार राहणार नाही. पण ब्राह्मण लोक आपल्या हातात सत्ता येऊ देत नाहीत. -मुसलमानी राज्य असताना ब्राह्मण लोकांनी ' अल्ला हो अकबर ' म्हणून दिवस काढले. आज ते इंग्रजांची सेवा करीत आहेत. इंग्रजांचा उदोउदो करून सर्व महत्त्वाच्या नोकऱ्या ब्राह्मणांनी पटकावल्या आहेत. ही परिस्थिती आपण नष्ट करून राजसत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे. त्याकरिता आपण आपले सामर्थ्य उभे केले पाहिजे. काँग्रेस-लीगसारखी धनदौलत आपल्या पक्षाजवळ नाही. स्वराज्यात दुसऱ्याचे राज्य आपल्यावर होईल. त्याकरिता आपण सर्व मनुष्यबल एकत्रित करून सामर्थ्य वाढविले पाहिजे. हिंदू लोकांचा एक वेगळा गट आहे. मुसलमानांचा एक वेगळा गट आहे व आपला एक गट वेगळा आहे. असे या देशात प्रमुख तीन वेगवेगळे गट आहेत. या देशाची राजसत्ता या तिन्ही गटातून सारखी वाटली गेली पाहिजे. राजसत्तेची विभागणी सारखी झाल्याशिवाय