राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्याशिवाय स्वराज्याला काय अर्थ ? ४४७
या देशाला स्वराज्य मिळणार नाही. इंग्रज मुसलमानांना मोठे मानतात व सवलतीही त्यांना सरकारकडून मिळतात. आज मुसलमानांची पाकिस्तान किंवा ५० टक्के ही मागणी आहे. काँग्रेसचे लोक बाहेर येतील आणि ५० टक्के मुसलमानांना देतील. पण आपल्या मागण्या आपल्या सामर्थ्याशिवाय मिळणार
नाहीत. काँग्रेस व मुसलमानांना अस्पृश्यांच्या मागण्या मिळाव्यात असे वाटत नाही म्हणून मी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनची स्थापना केली आहे. आता हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य लोकांनी एकत्रित येऊन संग्रामास
तयार झाले पाहिजे.
आपल्या मानाकरिता व पुढारी होण्याकरिता फार हपापलेले लोक आहेत. फाईलीत किंवा कागदात पुढारीपण नसते. वर्तमानपत्रात नाव आल्याने माणूस पुढारी होत नसतो. सी. आय. डी. ऑफिस फार मोठे आहे. त्यात प्रत्येक पुढाऱ्याच्या कार्याची डायरी ठेवली जाते. तुमची तशी डायरी तयार झाली पाहिजे. खरे काम करा. आपल्या हक्कांकरिता बलिदान करा. गव्हर्नरला पुढाऱ्याची भीती वाटली पाहिजे. पुढाऱ्याचे ऐकले नाही तर ज्या समाजाचा तो पुढारी आहे तो समाज आपल्या डोक्यावर जोडे मारील ही धास्ती गव्हर्नरला वाटली पाहिजे. याला म्हणतात सच्चा पुढारी.
अस्पृश्य समाजामध्ये संघटन नाही. अस्पृश्य लोक अद्याप आपल्यामध्ये शिवाशिवी मानतात. ब्राह्मणापेक्षाही मोठा प्लेग आपल्यात आहे. जातीधर्म आपल्यामधून नष्ट झाला पाहिजे. मी जातपात मानीत नाही. जात मानणारा पुढारी होऊ शकत नाही, हा माझा २५ वर्षांचा अनुभव आहे.
समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पार्टीचे सामर्थ्य आहे. लढणाऱ्या सैनिकांशिवाय कोणतीही पार्टी सामर्थ्यवान होणार नाही. आपल्याला तर मोठमोठ्या संस्थांशी टक्कर द्यावयाची आहे. म्हणून आपण समता सैनिक दल वाढविले पाहिजे. समता सैनिक दल वाढविणे हे प्रत्येक पुढाऱ्याचे कर्तव्य आहे. कानपुरात आणि इतर सर्व ठिकाणी दलाची स्थापना करा. दर महिन्याला दलाच्या सभासदाकडून एक आणा वर्गणी घ्या. आमच्या मुंबईत समता सैनिक दलाचे कार्य जोरात चालू आहे. परिषदेनंतर आपले कार्य थंड पडत असते. ते पडू देऊ नका. आपले कार्य अव्याहतपणे चालू असले
पाहिजे. लोकांना जागृत करा. तरूणांना संघटित करा.
मला जी अनेक संस्थांकडून मानपत्रे देण्यात आली आहेत, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण मला ते नकोत. मला फक्त काम करावयाचे आहे. मी जर मानाकरिता काम करीत असतो, तर भी काँग्रेसचा अध्यक्ष झालो असतो. मला तुम्हाला सांगावेसे वाटते ते हे की, काम करा, म्हणजे मान तुमच्या पाठीमागे धावत येईल.